‘रक्ताचं नातं’ या अभिनव उपक्रमात सहभागी व्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 06:16 AM2021-06-28T06:16:54+5:302021-07-01T16:52:00+5:30
‘लोकमत’तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाकाळात राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हे लक्षात घेऊन ‘लोकमत’ने ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त दि. २ ते १५ जुलै या कालावधीत ‘रक्ताचं नातं’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. विविध संस्था, संघटनांना ‘लोकमत’च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करता येऊ शकते. शिबिर आयोजित करण्यास पुढाकार घेणाऱ्यांना रक्तपेढीसह सर्व तांत्रिक बाबी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
‘लोकमत’ व राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे (एसबीटीसी) राज्यभर रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे. रक्ताला जात, धर्म, पंथ नसतो. रक्तदानाने माणुसकीचे नाते तयार होते. त्यामुळे रक्तदानाच्या या महायज्ञात आपण सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’ने केले आहे. ‘लोकमत’च्या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी येत्या २७ ते ३० जूनपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी मुंबई महानगर प्रदेशात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी रोनाल्ड डिसोझा यांना ९०८२९९६५८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.