गुंतवणूकदारांसोबत सरकारची भूमिका भागीदाराची

By admin | Published: December 2, 2014 04:29 AM2014-12-02T04:29:09+5:302014-12-02T04:29:09+5:30

‘मेक इन महाराष्ट्र’चे ध्येय गाठण्याचा आमचा ठाम निर्धार असून, उद्योग, गुंतवणूक क्षेत्रातील सर्व परवानग्या फास्ट ट्रॅकवर आणण्यात येतील

The partner's role with the investors | गुंतवणूकदारांसोबत सरकारची भूमिका भागीदाराची

गुंतवणूकदारांसोबत सरकारची भूमिका भागीदाराची

Next

मुंबई : ‘मेक इन महाराष्ट्र’चे ध्येय गाठण्याचा आमचा ठाम निर्धार असून, उद्योग, गुंतवणूक क्षेत्रातील सर्व परवानग्या फास्ट ट्रॅकवर आणण्यात येतील आणि गुंतवणूकदारांसोबत आम्ही भागीदाराची भूमिका पार पाडू, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा येथील जागतिक दर्जाच्या बहुउद्देशीय पोर्ट टर्मिनल आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर या प्रकल्पाचा औपचारिक प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव एस.के. शर्मा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग जैन, करंजा टर्मिनल आणि लॉजिस्टिक प्रा.लि.चे अध्यक्ष निखिल गांधी व आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योगांच्या भरभराटीसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे रोजगाराच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे राज्यातील उद्योगांच्या भरभराटीसाठी बंदरांच्या सुविधाही आवश्यक आहेत. जवळपास एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला व येत्या दोन वर्षांत पूर्ण होणारा हा प्रकल्प करंजा परिसराचा कायापालट करणार आहे. शासनाने उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक ई-प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. जलद परवानग्यांसाठी सचिवस्तरीय समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’चे ध्येय गाठण्यासाठी बंदरे, रेल्वे, रस्ते आदी सर्व क्षेत्रांत गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांनी महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे.
निखिल गांधी यांनी शासनाच्या सहकार्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते औपचारिक प्रारंभ झालेल्या या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम आजच सुरू होत आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून मिळालेले त्वरित सहकार्य आणि प्रतिसाद हा आमच्यासाठी सुखद धक्का होता. हा प्रकल्प होत असलेल्या करंजा परिसराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू. दोन वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा आमचा निर्धार शासनाच्या विधायक प्रतिसादामुळे दुणावला आहे.’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन बक्षी यांनी आभार मानले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: The partner's role with the investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.