पक्षातले नाराज आपोआपच एकत्र येतात, मोट बांधावी लागत नाही; खडसेंचा सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 07:19 PM2019-12-04T19:19:15+5:302019-12-04T19:19:56+5:30
पक्षातले नाराज आपोआपच एकत्र येतात, मोट बांधावी लागत नाही, असा सूचक इशारा खडसेंनी दिला आहे.
मुंबईः पक्षातले नाराज आपोआपच एकत्र येतात, मोट बांधावी लागत नाही, असा सूचक इशारा खडसेंनी दिला आहे. पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंनी प्रसार माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी पक्षविरोधी काम केलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई होईल ही अपेक्षा करू या, वरिष्ठ नेत्यांच्या कानावर या गोष्टी मी घातलेल्या आहेत. मला काही कोणा मध्यस्थाची गरज नाही. मीडियाच्या माध्यमातून जावं याचीही मला आवश्यकता नाही. मी वरिष्ठांनी समक्ष बोलू शकतो. जे काही घडलेलं आहे, पक्षामध्ये जी अनेकांमध्ये अस्वस्थता आहे. ते सर्व वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे, असंही ते म्हणाले आहेत.
पंकजाताई आणि रोहिणीताईंचा पराभव हा काही पक्षातील अंतर्गत लोकांमुळे झालेला दिसतोय. प्रथमदर्शनी तरी असं दिसतंय आणि ज्यांनी ज्यांनी पक्षविरोधी काम केलेलं आहे, अशांची नावं मी स्वतः माननीय अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे दिलेली आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. 8 दिवसांत विरोधी पक्षनेत्यांचं मूल्यमापन करता येणार नाही, आज विरोधी पक्षनेता देवेंद्रजी झालेत, त्यांचं मी अभिनंदन करतो, तसेच उद्धवजींनाही मी शुभेच्छा देतो, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महायुतीला या ठिकाणी जनतेनं मतदान केलं होतं. महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपा हे दोन प्रमुख घटक आहेत. दोघांच्याही समन्वयानं चर्चा झाली असती आणि दोन पावलं मागे गेलो असतो. तर महायुतीचाच मुख्यमंत्री या ठिकाणी झाला असता, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.
दुर्दैवानं ओबीसी नेत्यांना डावलण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे. बहुजन समाज आणि ओबीसींचं नेतृत्व करणारे नेते आहेत, तेच या ठिकाणी हरलेले दिसतायत. पंकजाताई किंवा बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहतांना तिकीट न देण्याचा प्रकार असेल, तसेच ओबीसी नेत्यांचाही पराभव झालेला आहे. कारण काय असतील ते नंतर तपासू, महाराष्ट्रात जे 105 लोक आले, त्यापेक्षा अधिक आले असते तर पुनर्रचना झाली असती. प्रथमदर्शनी तरी असं दिसतंय आणि ज्यांनी ज्यांनी पक्षविरोधी काम केलेलं आहे, अशांची नावं मी स्वतः माननीय अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे दिलेली आहेत. त्यांनी कारवाई करावी ही अपेक्षा केलेली आहे, असंही एकनाथ खडसे म्हणालेले आहेत.