मला पक्ष महत्त्वाचा आहे, नारायण राणेंवर बोलण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 05:16 AM2017-09-19T05:16:08+5:302017-09-19T05:16:11+5:30
नारायण राणे अजूनही काँग्रेस पक्षात आहेत. ते पक्षात राहिले पाहिजेत अशीआमची इच्छा आहे. पण पक्षांतर्गत विषयांवर जे काही बोलायचे ते त्यांनी पक्षात बोलावे, मी बाहेर जाहीरपणे काहीही बोलणार नाही, माझ्यासाठी पक्ष महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली.
अतुल कुलकर्णी
मुंबई : नारायण राणे अजूनही काँग्रेस पक्षात आहेत. ते पक्षात राहिले पाहिजेत अशीआमची इच्छा आहे. पण पक्षांतर्गत विषयांवर जे काही बोलायचे ते त्यांनी पक्षात बोलावे, मी बाहेर जाहीरपणे काहीही बोलणार नाही, माझ्यासाठी पक्ष महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली.
राणे यांनी कुडाळमध्ये खा. चव्हाण यांच्यावर तीव्र टीका केली. त्यावर खा. चव्हाण म्हणाले, पक्षात कोणी काय केले, पक्ष कोणी किती वाढवला, नांदेडमध्ये किती आणि अन्य जिल्ह्यात किती याचे मुल्यमापन लोक करत असतात. आकडेवारी समोर आहे. पण मला राणे यांच्याविषयी काहीही बोलायचे नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत. कसे वागावे, बोलावे हे त्यांनी ठरवावे. मी पक्ष कार्यालयात कोणत्याही विषयावर, कधीही बोलायला, भेटायला तयार आहे. पण पक्षातील मतभेद, विचार जाहीर व्यासपीठावर बोलण्याची काँग्रेसची परंपरा नाही. मला माझा पक्ष सांभाळायचा आहे, असेही चव्हाण म्हणाले.
तुम्ही रत्नागिरीत जिल्हाध्यक्ष चार वर्षे नेमला नाही आणि सिंधुदर्गात मात्र आहे तो बदलला, असा राणेंचा आक्षेप आहे. त्यावर खा. चव्हाण म्हणाले, पक्षाअंतर्गत निवडणुकीची प्रक्रिया राज्यभर चालू आहे. त्यामुळे त्यावर मी काहीही भाष्य करणार नाही. कोण कुठे काय करतो याच्या व्हिडीओ क्लीप सगळीकडे फिरत असतात. त्यावर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी शांत कसा बसणार, असे ते म्हणाले.
>शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे पावसात गेले वाहून
शिवसेनेने आमदारांशी थेट चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्याची घोषणा केलीय. सेनेने आॅफर दिल्यास आपण शिवसेना, राष्टÑवादी असे सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे हे खरे आहे का? असे विचारले असता खा. चव्हाण म्हणाले, अशी कोणतीही बोलणी झालेली नाही. मध्यंतरी याच शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. ते कदाचित परवा झालेल्या मुंबईतल्या मुसळधार पावसात वाहून गेले असतील. त्यामुळे ते असे बोलले असतील. सेनेच्या कोणत्याही भूमिकेवर विश्वास राहीलेला नाही. शिवसेना सत्तेशिवाय राहू शकत नाही त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर काय सांगणार? असेही ते म्हणाले.