पक्षातील नेत्याचा माझ्याविरोधात कट, अब्दुल सत्तार यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 06:23 AM2023-01-01T06:23:40+5:302023-01-01T07:48:47+5:30
मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोपही सध्या माझ्यावर करण्यात आले आहेत. एकप्रकारे मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सत्तार यांनी केला आहे.
औरंगाबाद : मंत्रिपद न मिळालेला माझ्याच पक्षातील नेता माझ्याविरोधात कट करत असून, याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे लवकरच तक्रार करणार असल्याचा खळबळजनक आरोप कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. या प्रकारामुळे शिंदे गटात सुरु असलेली अंतर्गत कुरघोडी चव्हाट्यावर आली आहे.
राज्यात झालेला टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सवासाठी अधिकाऱ्यांना दिलेले टार्गेट, गायरान जमिनीचे प्रकरण यावरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी चांगलेच घेरले होते. प्रसारमाध्यमांनीही याबाबत बातम्या दिल्या होत्या. मोठा गदारोळ झाल्यानंतर याबाबत अधिवेशनात कृषिमंत्री सत्तार यांनी आपली बाजू मांडली. तरीही सभागृहात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चर्चा अद्याप राज्यभर सुरूच आहे.
या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री सत्तार यांनी शनिवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वपक्षातील नेत्यांवरच गंभीर आरोप केला आहे. या मुलाखतीत ते म्हणाले की, ज्याला मंत्रिपद मिळाले नाही, असा स्वपक्षातील नेता माझ्याविरोधात सध्या कट करत आहे. या प्रकाराबाबत आपण लवकरच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. माझ्यावर झालेल्या सर्व आरोपांचे खुलासे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहेत.
मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोपही सध्या माझ्यावर करण्यात आले आहेत. एकप्रकारे मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सत्तार यांनी केला आहे.
माझ्यावर आरोप का केले जात आहेत, राष्ट्रवादीची माझ्यावर का चीड आहे, याचे कारण मला माहीत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. आमच्यातील कोणीतरी बाहेर या बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे.
- अब्दुल सत्तार, कृषिमंत्री