रेल्वेच्या पार्किंग इमारतीत दारू पार्टी!

By admin | Published: June 6, 2017 04:15 AM2017-06-06T04:15:04+5:302017-06-06T04:15:04+5:30

रेल्वे स्टेशन परिसरात उभारण्यात येत असलेल्या पार्किंगच्या इमारतीत रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्या

Party in Rail Parking Parking! | रेल्वेच्या पार्किंग इमारतीत दारू पार्टी!

रेल्वेच्या पार्किंग इमारतीत दारू पार्टी!

Next

पंकज रोडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रेल्वे स्टेशन परिसरात उभारण्यात येत असलेल्या पार्किंगच्या इमारतीत रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्या असून येथे रात्रीच्या वेळेस दारूच्या पार्ट्या रंगत असल्याची साक्ष देत आहेत. महत्त्वाचे म्हणजे हाकेच्या अंतरावर रेल्वे लोहमार्ग पोलीस, सुरक्षा बल तसेच स्टेशन प्रबंधक कार्यालय आहे. तरीसुद्धा, या पार्ट्या कोणाच्या नजरेत कशा येत नाहीत, अशी चर्चा रेल्वे प्रवाशांमध्ये रंगली आहे. ही मंडळी जाणूनबुजून तर त्या पार्ट्यांकडे कानाडोळा करीत नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.
ठाणे स्थानकाच्या आवारात वाहने पार्क करण्यासाठी बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. त्यासाठी रेल्वेचे लोहमार्ग पोलीस ठाणेही दुसरीकडे हलवण्यात आले आहे. या इमारतीचा तळ अधिक एक मजला उभा राहिला आहे. मात्र, हे काम निधीअभावी कित्येक दिवसांपासून रखडले आहे. याचदरम्यान, ठाणे शहराचे भाजपा आमदार संजय केळकर यांनी, या रखडलेल्या कामासह रेल्वे प्रवाशांच्या विविध विषयांबाबत रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची भेट घेऊन त्याबाबत चर्चा केली. त्या वेळी हे काम लवकरच सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, त्या आश्वासनाची कुठलीच पूर्तता झालेली नाही. वाहन पार्किंगसाठी मात्र हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर परिसरात लावलेल्या बेशिस्त वाहनांमधून रस्ता काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या बहुमजली पार्किंग इमारतीचे काम पुढे सरकत नसले तरी, पहिला मजला दररोज रात्रीच्या वेळेस दारूच्या पार्ट्या करण्याचा अड्डा झाला आहे. दारू पिऊन तर्र होणारे तेथेच बाटल्या टाकून जातात.
त्यामुळे हे पार्टी करणारे कोण, त्यांना तेथे कोणी परवानगी दिली, लोहमार्ग पोलीस आणि सुरक्षा बल यांचे त्याकडे कसे लक्ष जात नाही, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. या परिसरात गर्दुल्ल्यांनी आपले बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. दिवस असो वा रात्र तेथे गर्दुल्ले विसाव्यासाठी असल्याचे पाहण्यास मिळते.
>...त्या घटनेने तरी शहाणे व्हावे
नुकताच, अंबरनाथ येथे रेल्वे सुरक्षा दलाचा जवान सुधीर कांबळे यांनी रेल्वेच्या हद्दीत दारू पिण्यास विरोध केला. त्यामुळे ७ ते ८ जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यामध्ये ते जबर जखमी झाले आहेत. दरम्यान, ठाण्यातील पार्किंग इमारतीतील चित्र पाहता येथील पोलीस यंत्रणा कधी जागी होईल, असा सवाल उपस्थित होत आहे.
असे प्रकार घडत असतील, तर हे चुकीचे आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाची अकार्यक्षमता समोर आली आहे. ठाणे स्थानक आणि आवारात घडणाऱ्या बारीकसारीक घटनांकडे स्थानक प्रबंधकांनी लक्ष द्यावे. महिला आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे विशेषकरून रेल्वे पोलीस असो वा प्रबंधक यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
- कांचन खरे, मध्य रेल्वे झोनल कमिटी
खासदारांनी लक्ष द्यावे
एकीकडे कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच कल्याण रेल्वे स्थानकातील जुगार अड्ड्यावर धाड टाक ली होती. त्याप्रमाणे ठाण्याचे शिवसेना पक्षाचे खासदार राजन विचारे हे स्थानकात अनैतिक धंद्यांना कधी आळा घालणार, अशी चर्चा सुरू आहे.

Web Title: Party in Rail Parking Parking!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.