... या पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त; रोहित पवारांनी शेअर केल्या कार्यकर्त्याच्या शरद पवारांबद्दलच्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 08:30 AM2021-04-02T08:30:24+5:302021-04-02T08:35:54+5:30
Sharad Pawar : शरद पवार होणं हे कुणाचंही काम नाही, अशा भावनाही कार्यकर्त्यानं व्यक्त केल्या आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुढील काही दिवसांत त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल एका कार्यकर्त्यानं व्यक्त केलेल्या भावना शेअर केल्या आहेत. शरद पवार होणं हे कुणाचंही काम नाही, अशा भावना एका कार्यकर्त्यानं व्यक्त केल्या आहेत.
"या पायाच्या प्रत्येक रेषेला लागलेली आहे महाराष्ट्राच्या अक्षांश रेखांशावरील माती, किल्लारीचा भूकंप असो की कोल्हापुरचा महापूर.. संकटांच्या मानगुटीवर उभं राहून दिलासा द्यायला हेच पाय धावले, याच पायांना दररोज झाल्या कितीही जखमा, खांद्यावर आलं कितीही ओझं, तरी त्यांनी कधी केली नाही तक्रार, किती आले किती गेले, पण सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे," अशा शब्दांत एका कार्यकर्त्यांनं आपल्या भावना व्यक्त केल्याचं रोहित पवारांनी शेअर केलं आहे.
"हे पाय आहेत जमिनीवरचे... आणि याच जमीनीतील मातीचा टिळा आहे भाळी, त्यामुळं आज दुखलेत, सुजलेत, रक्ताळलेत, पण थांबले नाही आणि थांबणारही नाहीत कधी, कारण या पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त जे कधीच आटणार नाही," अशाही भावना त्या कार्यकर्त्यानं व्यक्त केल्या आहेत.
आदरणीय @PawarSpeaks साहेबांविषयी एका कार्यकर्त्याने व्यक्त केलेल्या आपल्या भावना मला 'व्हाट्स अप'वर आल्या. त्या मी तुमच्यासाठी इथं शेअर करतोय.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 1, 2021
जरूर वाचा! pic.twitter.com/fhtj13VeL3
शरद पवारांवर पुन्हा एक शस्त्रक्रिया
शरद पवार यांच्यावर पुन्हा एक शस्त्रक्रिया करावी लागणार असून त्यासाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागणार आहे. ही शस्त्रक्रिया लगेच किंवा १० दिवसांनी केली जाऊ शकते, असं डॉक्टरांनी सांगितले आहे. शरद पवार यांची प्रकृती लवकर स्थिर झाल्यास ती लवकरही केली जाऊ शकते. तरीही डॉक्टरांनी १० दिवसांनी शस्त्रक्रिया करणं योग्य ठरेल असं सुचवलं आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली होती.
दरम्यान, शरद पवार यांना सोमवारी पित्ताशयाचा त्रास झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करुन शस्त्रक्रिया करण्याचे ठरवण्यात आलं होतं. मात्र, अधिक त्रास जाणवू लागल्यानं मंगळवारी रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे शरद पवार यांचे सर्व नियोजित कार्यक्रम आणि दौरे रद्द करण्यात आले. पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पश्चिम बंगालसह इतर राज्यांमध्ये निवडणुक प्रचार दौरा करणार होते.