२० घरांमागे संपर्कदूत; भाजपचे अभियान
By यदू जोशी | Published: October 13, 2022 06:12 AM2022-10-13T06:12:10+5:302022-10-13T06:12:31+5:30
पावणेदोन कोटी परिवारांशी साधणार संपर्क; पन्ना प्रमुख अभियानाला पर्याय
- यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रत्येक वीस घरांची जबाबदारी एका कार्यकर्त्याला देत राज्यातील पावणेदोन कोटी कुटुंबांशी कायमस्वरुपी संपर्क राखणारे अनोखे अभियान प्रदेश भाजपच्या वतीने लवकरच सुरू करण्यात येणार आहे. गेली काही वर्षे सुरू असलेल्या पन्ना प्रमुख अभियानाची जागा हे नवीन अभियान घेणार आहे. ‘प्रत्येक परिवार, भाजप परिवार’ अशी या अभियानाची थीम असेल. तब्बल १३ लाख संपर्कदूत नेमण्यात येणार असून, त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे. प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.
संपर्कदूत हे २० नोव्हेंबरपर्यंत नेमले जातील. एका ॲपद्वारे त्यांना जोडले जाईल. २३ नोव्हेंबरपासून हे अभियान सुरू करण्याची योजना आहे. संपर्कदूताने त्याच्यावर जबाबदारी असलेल्या २० कुटुंबांशी संपर्क राखावा. संपर्कदूत हा आपला हक्काचा माणूस आहे, असे त्या कुटुंबांना वाटेल, अशी भावना निर्माण करावी, असे अपेक्षित आहे. अमरावती जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या सूचनेनुसार अमरावती विधानसभा मतदारसंघात पायलट प्रोजेक्ट म्हणून याची तयारी सुरू केली आहे. औरंगाबादला होणाऱ्या बैठकीत अभियानाचे सादरीकरण ते करतील.
जे. पी. नड्डा महाराष्ट्रात : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा १७ आणि १८ ऑक्टोबरला महाराष्ट्रात दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ते प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच प्रदेश भाजपच्या कामगिरीचा आढावादेखील घेतील.