मित्रासाठी पत्नीला केले लंकेची पार्वती
By admin | Published: July 7, 2014 03:51 AM2014-07-07T03:51:40+5:302014-07-07T03:51:40+5:30
सुमारे १० वर्षांपासून घाटले गावात कंत्राटदार म्हणून काम करणाऱ्या संजय पांचाळ यांनी व्यवहारातही मैत्री जपल्याचे त्यांचे मित्र विठ्ठल तांडेल सांगत होते
समीर कर्णुक, मुंबई
सुमारे १० वर्षांपासून घाटले गावात कंत्राटदार म्हणून काम करणाऱ्या संजय पांचाळ यांनी व्यवहारातही मैत्री जपल्याचे त्यांचे मित्र विठ्ठल तांडेल सांगत होते.
तांडेल म्हणाले, ‘चार महिन्यांपूर्वीच परिसरातील काही मित्रांच्या ओळखीने पांचाळ यांचा परिचय झाला होता. मात्र अल्पावधीतच त्यांच्याशी चांगली मैत्री झाली होती. घराच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्यानंतरही पांचाळ यांनी पैशांची मागणी केली नाही. पैशांची चणचण असल्याने अर्धवट काम झाल्यानंतर मी उर्वरित काम नंतर करण्यास सांगितले. मात्र माझी अडचण जाणून पांचाळ यांनी स्वत:च्या खिशातील पैसे घालून काम सुरूच ठेवले. महत्त्वाची बाब म्हणजे त्या वेळी पांचाळ यांच्याकडेही पैसे नव्हते. अधिक माहिती घेतली असता पांचाळ यांनी स्वत:च्या पत्नीच्या हातातील सोन्याच्या बांगड्या सोनाराकडे गहाण ठेवून ते पैसे व्याजाने उचलल्याचे समजले.’ आज चार महिन्यांच्या काळात पांचाळ यांनी एकदाही आपल्याकडे पैशांची मागणी केली नसल्याचे तांडेल यांनी सांगितले. शुक्रवारी तांडेल यांनी पांचाळ यांना पैसे परत करण्याचे कबूल केले होते. मात्र पैशांची तरतूद होऊ शकली नाही. तसे तांडेल यांनी पांचाळ यांना फोनवर सांगितले. मात्र नाराज होण्याऐवजी काहीही न बोलताच ‘दे रे नंतर’ असे सांगत पांचाळ यांनी अधिक मुदत दिली. या अखेरच्या संवादाबाबत सांगताना तांडेल यांचा कंठही दाटला होता.