'त्या' प्रवाशाला बोरीवली-अंधेरी फर्स्ट क्लासचा पास पडला 1.3 लाख रुपयांना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 04:19 PM2017-08-16T16:19:44+5:302017-08-16T16:27:33+5:30
ई-पेमेंटची सुविधा प्रवाशांच्या फायद्याची असली तरी, प्रवाशांकडून कार्डने पेमेंट स्विकारताना रेल्वे कर्मचा-यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
मुंबई, दि. 16 - रेल्वेच्या बुकिंग काऊंटरवर सुरु झालेली ई-पेमेंटची सुविधा प्रवाशांच्या फायद्याची असली तरी, प्रवाशांकडून कार्डने पेमेंट स्विकारताना रेल्वे कर्मचा-यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण काही दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेमार्गावर क्लार्ककडून अनावधानाने घडलेल्या चुकीचा एका प्रवाशाला जबर आर्थिक फटका बसला.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार दहीसर येथे राहणारे विकास मंचेकर 4 ऑगस्टला अंधेरी-बोरीवली मार्गावरचा फर्स्ट क्लासचा तिमाहीचा पास काढण्यासाठी बोरीवली रेल्वे स्थानकात गेले होते. या मार्गावरचा फर्स्ट क्लास पास 1,333.30 रुपयांना आहे. मंचेकर यांनी बुकिंग विंडोवरच्या क्लार्कला आपले क्रेडिट कार्ड स्वाईप करण्यासाठी दिले. त्यावेळी त्या क्लार्कने 1,333.30 ऐवजी 1,33,330 लाख रुपयांची रक्कम डेबिट केली. त्यामुळे आता उर्वरित लाखो रुपयांची रक्कम परत मिळवण्यासाठी मंचेकर यांना पश्चिम रेल्वेच्या कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत.
आणखी वाचा
चीनी स्मार्टफोन वैयक्तिक माहिती चोरत असल्याची भीती, केंद्र सरकारची नोटीस
'इंदिरा'ऐवजी चुकून 'अम्मा' बोलून फसले राहुल गांधी
विकास मंचेकर यांनी लगेच हा प्रकार स्टेशन अधिका-यांच्या लक्षात आणून दिला. रक्कम परत मिळावी यासाठी लिखित तक्रारही केली. ज्या बँकेने क्रेडिट कार्ड इश्यू केले तिथेही फोन केला पण त्याचा उपयोग झाला नाही. 24 ऑगस्टची डयु डेट असून तो पर्यंत रक्कम खात्यात जमा झाली नाही तर, त्यांना 4 ते 5 हजार रुपयांचे व्याज भरावे लागेल. बँकेने व्याज आकारले तर, पश्चिम रेल्वेने भरपाई करावी अशी त्यांची मागणी आहे. पैसे परत मिळवण्यासाठी मंचेकर यांना त्यांच्या दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मुंबई सेंट्रल येथे चकरा माराव्या लागत आहेत. तेथे पश्चिम रेल्वेचे विभागीय कार्यालय आहे.
काऊंटरवरील बुकिंग क्लार्क विरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्यात आली आहे असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितले. प्रवाशाला त्याचे अतिरिक्त पैसे लवकरात लवकर परत मिळावेत यासाठी स्टेट बँकेबरोबर चर्चा करण्यासाठी पश्चिम रेल्वेने एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारची चूक होऊ नये यासाठी रेल्वेने त्यांच्या कर्मचा-यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण दिले पाहिजे असे विकास मंचेकर म्हणाले.