विमान प्रवाशाची तब्येत बिघडली, डॉ. भागवत कराड आणि डॉ. सुभाष भामरे धावले मदतीला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 02:55 PM2022-06-19T14:55:53+5:302022-06-19T14:59:31+5:30
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी विमानात एका व्यक्तीवर तातडीने वैद्यकीय उपचार केले. एअर इंडियाने याबाबत माहिती दिली. आहे.
संतोष हिरेमठ
औरंगाबाद: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड(Dr Bhagwat Karad) यांच्यातला डॉक्टर परत एकदा जागा झाल्याचे चित्र विमानात पाहायला मिळाले. एअर इंडियाच्या दिल्ली-औरंगाबादविमान प्रवासात एका प्रवाशाची प्रकृती बिघडली. याच विमानातून डॉ. भागवत कराड आणि खा. डॉ. सुभाष भामरे प्रवास करीत होते. प्रवाशाच्या प्रकृतीविषयी माहिती मिळताच दोघांनी त्याच्याकडे धाव घेत मदतीचा हात दिला. एअर इंडियाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
#FlyAI : A passenger onboard our Delhi-Aurangabad flt yesterday fell ill. As per SOP the crew announced to check if any doctor was on board. We would like to thank Dr B.K. Karad(Mos Finance) & Dr. Subhash Bhamre who immediately attended to him. pic.twitter.com/kmN8CMGYDL
— Air India (@airindiain) June 17, 2022
विमान प्रवासात एका प्रवाशाची प्रकृती बिघडली असून, विमानात कोणी डॉक्टर आहे का, अशी विचारणा विमानातील कर्मचाऱ्यांनी केली. तेव्हा डॉ. कराड आणि डॉ. भामरे यांनी त्या प्रवाशाकडे धाव घेतली. यावेळी प्रवाशाला प्राथमिक उपचार देण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत एका कार्यक्रमात अचानक कोसळलेल्या एका कॅमेऱ्यामनला देखील डॉ. भागवत कराड यांनी प्राथमिक उपचार दिले होते. डॉ. कराड आणि डॉ. भामरे यांच्या समयसूचकता आणि सेवाभावाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
कॅमेरामनसाठी डॉ. कराड धावले
नुकतीच, डॉ. भागवत कराड यांनी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये मुलाखत आयोजित केली होती. तेथे एका कॅमेरामनला भोवळ आली व तो जमिनीवर कोसळला. यावेळी तात्काळ डॉ. कराड यांच्या ही बाब लक्षात आल्याबरोबर मंत्रिपद बाजूला ठेवून त्यांनी लगेच या व्यक्तीवर उपचार करण्यास सुरुवात केली. त्या व्यक्तीवर प्रथमोपचार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
यापूर्वी असाच प्रसंग घडला होता
दरम्यान, गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर रोजी असाच प्रसंग घडला होता. भागवत कराड इंडिगोच्या विमानातून प्रवास करत होते. यादरम्यान, त्यांच्या मागील सीटवरील प्रवासी अचानक कोसळून पडला. यावळी डॉ. कराड यांनी तत्काळ प्रथमोपचार करत त्याला दिलासा दिला. त्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात कराड अपघातग्रस्त मुलासाठी धावून गेले होते. औरंगाबाद शहरात कराड यांच्या गाडीसमोर एक रिक्षा उलटली. यावेळी कराड यांनी ताबडतोब आपला ताफा थांबवून तातडीने जखमींकडे धाव घेतली. 2 लहान मुले जखमी झाली होती. डॉ. कराड यांनी स्वत:च्या खिशातील रुमाल काढून जखमी मुलाच्या ओठातून येणारा रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न केला. त्या मुलाला डोक्याला काही मार लागला आहे का, हे तपासले.