मध्य रेल्वेच्या प्रवाशांना 'अनुभूती'साठी तुर्तास पहावी लागणार वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 01:11 PM2017-09-13T13:11:42+5:302017-09-13T13:11:42+5:30
‘हाय-लक्झरी’ अशी ओळख असलेल्या ‘अनुभूती’ बोगीसाठी तुर्तास मध्य रेल्वेच्या प्रवाशांना वाट पहावी लागणार आहे.
- महेश चेमटे
मुंबई, दि. 13- ‘हाय-लक्झरी’ अशी ओळख असलेल्या ‘अनुभूती’ बोगीसाठी तुर्तास मध्य रेल्वेच्या प्रवाशांना वाट पहावी लागणार आहे. आधुनिक आणि प्रगत अशी अनुभूती बोगी चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) तयार झाली आहे. ही बोगी प्रवासासाठी सज्ज आहे. या बोगीसाठी पश्चिम रेल्वेवरील राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसचे नाव जवळपास निश्चित करण्यात येत आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना अनुभूतीसाठी तुर्तास वाट पहावी लागणार आहे.
लिंके-हॉफमॅन-बुश (एलएचबी) प्रकारात अनुभूती बोगीची निर्मिती करण्यात आली आहे. अनुभूती बोगीत ५६ आसने असणार आहेत. आरामदायी खुर्ची, पाय ठेवण्यासाठी अधिक मोकळी जागा, प्रत्येक आसनाच्या मागे ९ इंच एलसीडी स्क्रीन, वैयक्तिक मोबाईल चार्जिंग अशी सुविधा देण्यात आली आहे. बोगीच्या मध्यभागी छताला दोन स्क्रीन असून यात जीपीएस तंत्रज्ञानाने ‘रिअल टाईम’ नूसार गंतव्य स्थान, येणाऱ्या स्थानकाला लागणारा वेळ, प्रवासाचे अंतर हे दिसणार आहे. या बोगीत प्रथमच सेंसर युक्त पाण्याचे नळ आणि बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहे. अनुभूतीच्या बोगींना अॅन्टी-ग्राफिटी रंग देण्यात आला आहे. अशा पद्धतीने रंगवण्यात येणारी अनुभूती ही पहिलीच बोगी आहे.या प्रत्येक बोगीच्या किंमत सुमारे ३.५० कोटी रुपये आहे.
पश्चिम रेल्वेच्या शताब्दी किंवा राजधानी एक्सप्रेसच्या माध्यमाने अनुभूती प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. सर्व सोई-सुविधांनी युक्त प्रवास या उद्देशाने ही बोगी तयार करण्यात आली आहे. यामुळे या बोगीचे प्रवासी भाडे वातानुकूलित चेअर आणि एक्झिकेटिव्ह चेअर यांच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता रेल्वे सुत्रांनी वर्तवली आहे. यंदाच्या वर्षात फक्त १० बोगी तयार करण्यात येणार आहे. परिणामी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना तुर्तास तरी प्रवासासाठी 'अनुभूती' येणार नाही, अशी माहिती रेल्वे सुत्रांनी दिली.
प्रवाशांना सुरक्षित प्रवासासह सर्व सोई-सुविधांनी युक्त प्रवास अनुभवण्यासाठी अनुभूती बोगीची तरतूद रेल्वे बजेटमध्ये करण्यात आली होती. तब्बल चार वषार्नंतर अनुभूती बोगी भारतीय रेल्वेत दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे.
अशी आहे ‘अनुभूती’
- सेंसर युक्त पाण्याचे नळ आणि बायोटॉयलेट
- अॅन्टी ग्राफिटी पद्धतीेने रंग
- जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित वेग, येणारे स्थानक यांचे रिअल टाईम अपडेट
- यु.एस.बी.पोर्ट असलेली ९ इंच एलसीडी स्क्रीन, हेडफोन आणि एसी जॅक
- वैयक्तिक कॉल अटेंडरची सुविधा
- वैयक्तिक हेड लॅम्प आणि स्नॅक्स टेबल
- आरामादायी आसने आणि पाय ठेवण्यासाठी अधिक मोकळी जागा