पॅसेंजर बंद झाल्याने प्रवाशांना फटका; मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अनेक गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 01:37 PM2022-09-04T13:37:24+5:302022-09-04T13:39:07+5:30
रेल्वे मंत्रालयाने पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्याचा निर्णय घेतला.
मुंबई : पॅसेंजर गाड्या बंद करून त्यांच्या जागी कमी अंतरासाठी मेमू गाडीच्या फेऱ्या आणि लांब पल्ल्यासाठी चालवल्या जाणाऱ्या पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्यात आले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या काही पॅसेंजर गाड्या बंद झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. दरम्यान, पर्यायी व्यवस्था न करता या पॅसेंजर गाड्या बंद केल्यामुळे प्रवासी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावर पूर्वीच्या वलसाड, सुरत, भरूच पॅसेंजरच्या जागी मेमू गाड्यांच्या फेऱ्या तर पूर्वीच्या दोन अहमदाबाद पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये बदलून चालवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर पूर्वीची रत्नागिरी पॅसेंजर मध्य रेल्वेच्या हद्दीत एक्स्प्रेस म्हणून तर कोकण रेल्वेच्या हद्दीत पॅसेंजर म्हणून पारंपरिक पद्धतीने चालवली जात आहे. तर, सावंतवाडी पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करून चालवली जात आहे.
तसेच मध्य रेल्वे प्रशासनाने पर्यायी इतर कोणतीही सोय न करता गेल्या कित्येक वर्षांपासून पनवेल - पुणे - पनवेल पॅसेंजर बंद करून टाकली आहे, तर मुंबई - भुसावळ - मुंबई पॅसेंजर बंद करून ही गाडी इगतपुरी - भुसावळ दरम्यान मेमू गाडीव्दारे चालवली जाते. त्यामुळे लोणावळा ते पुणे दरम्यानच्या लहान स्टेशनवर थेट प्रवास करणे अशक्य झाले असून प्रवाशांना कर्जत व लोणावळा अशा दोन ठिकाणी गाड्या बदलून व कर्जत - लोणावळा दरम्यान लांबपल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेसने प्रवास करून ये-जा करावी लागत आहे.
प्रवाशांची गैरसोय : मुंबई परिसरातून इगतपुरी ते भुसावळ दरम्यानच्या छोट्या स्थानकांवरून थेट प्रवास करणे अशक्य झाले असून प्रवाशांना कसारा व इगतपुरी अशा दोन ठिकाणी गाड्या बदलून व कसारा - इगतपुरी दरम्यान लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसने प्रवास करून जा-ये करावी लागत आहे. त्यातही रेल्वेने अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे कसारा व इगतपुरी हाॅल्ट गेल्या काही वर्षांत रद्द केले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
आम्ही रेल्वे मंत्रालयाचा निर्णयाचा निषेध करतो, प्रवाशांची पर्यायी व्यवस्था न करता गाड्या रूपांतरित करणे योग्य नाही. रेल्वेने मुंबई - भुसावळ व पनवेल - पुणे पॅसेंजरच्या फेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात. - नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ