प्रवाशांची वाय-फायला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2016 04:45 AM2016-10-24T04:45:32+5:302016-10-24T04:45:32+5:30

एसटी बसमध्येही बसविण्यात आलेल्या वाय-फायला प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत आहे. महामंडळाने सप्टेंबर महिन्यात पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर स्थानकातून वेगवेगळ्या

Passengers preferred Wi-Fi | प्रवाशांची वाय-फायला पसंती

प्रवाशांची वाय-फायला पसंती

Next

मुंबई : एसटी बसमध्येही बसविण्यात आलेल्या वाय-फायला प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत आहे. महामंडळाने सप्टेंबर महिन्यात पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर स्थानकातून वेगवेगळ्या मार्गावर जाणाऱ्या ५0 बसमध्ये वाय-फाय बसविले. आतापर्यंत या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी चित्रपट पाहण्याबरोबरच, कॉमेडी मालिकांनाही सर्वाधिक पसंती दिली आहे. एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात सर्व १८ हजार बसेसमध्ये जुलै २0१७ पर्यंत वाय-फाय सेवा बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिवनेरी, हिरकणी आणि परिवर्तन बसमध्ये वाय-फाय बसविण्यात येत असून, आतापर्यंत पुण्याच्या शिवाजीनगर, स्वारगेटमधून (मुंबईकडे येणाऱ्या बसही)सुटणाऱ्या २४४ पैकी १८५ बसमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. मात्र, १८५ बसपैकी ५0 बसमध्ये वाय-फाय सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात आले आणि अन्य बसमधील वाय-फाय सेवा लवकरच सुरू केली जाईल. वाय-फाय सुविधेतून मनोरंजनाचा खजिना निवडण्यासाठी २0 आशय (कॅटेगरीज) देण्यात आले आहेत. त्यातून प्रवासी चित्रपट, मालिका, गाणी, बातम्या, कार्टून निवडू शकतात. आतापर्यंत प्रत्येक बसच्या एका फेरीत प्रवास करणाऱ्या २२ ते २५ प्रवाशांकडून वाय-फायचा लाभ घेतला जात आहे, तर प्रवासात सरासरी पाच ते सात प्रवासी असे आहेत की, त्यांना वाय-फाय सेवा हाताळता येत नाही. एसटी प्रवासात प्रवाशांकडून सर्वाधिक हिंदी चित्रपट पाहण्यास पसंती दिली जात असल्याचे समोर आले. यात त्याचे प्रमाण ४७ ते ४८ टक्के एवढे आहे, तर त्या पाठोपाठ मराठी चित्रपट पाहण्याचे प्रमाण हे २९ ते ३0 टक्के आहे. १0 ते १५ टक्के कॉमेडी मालिका पाहिल्या जात आहेत. त्या पाठोपाठ ६ ते ७ टक्के प्रमाण हे दक्षिणेकडील हिंदीत डब झालेले चित्रपट पाहण्याचे आहे. येत्या आठवड्यात पुण्यातील या दोन्ही डेपोंमधील सर्व बसमध्ये वाय-फाय बसविण्याचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर, त्वरित मुंबईतून सुटणाऱ्या एसटी बसमध्ये ही सुविधा बसविण्याचे काम हाती घेतले जाईल. मुंबईतील जवळपास ४९४ बसमध्ये वाय-फाय बसविण्याचे काम हे नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Passengers preferred Wi-Fi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.