सोलापूरमध्ये साकारतंय 5 जिल्ह्यांसाठी पासपोर्ट ऑफिस
By Admin | Published: May 16, 2017 03:59 PM2017-05-16T15:59:02+5:302017-05-16T15:59:02+5:30
सिद्धेश्वर मंदिरालगत असलेल्या रिपन हॉल या ऐतिहासिक इमारतीमध्ये लवकर सोलापूरचे पासपोर्ट कार्यालय सुरू होणार आहे.
>ऑनलाइन लोकमत /शिवाजी सुरवसे
सोलापूर, दि. 16 - सिद्धेश्वर मंदिरालगत असलेल्या रिपन हॉल या ऐतिहासिक इमारतीमध्ये लवकर सोलापूरचे पासपोर्ट कार्यालय सुरू होणार आहे. हेरिटेज इमारत असली तरी या इमारतील धक्का न लावता मॉर्डन लूक दिला असून यामुळे सोलापूरचे नाव आता देशाच्या नकाशावर कोरले जाणार आहे.
सोलापूर हे अनेक शहरांना महामार्गांच्या माध्यमातून जोडले जात आहे. शिवाय या ठिकाणी रेल्वेचे सुविधा देखील उत्तम आहे आणि येत्या सप्टेंबर पासून सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होत असल्यामुळे सोलापूरचे रुप पालटू लागले आहे. सोलापूर-पुणे महामार्गाचे झालेले चौपदरीकरण, सोलापूर-येडशी महामार्गाचे सुरू असलेले युद्धपातळीवरील काम, सोलापूर हैद्राबादचे चौपदरीकरण ही कामे सध्या सुरू असून सोलापूर शहर-परिसरात महामार्गांचे गुळगुळीत जाळे निर्माण केले जात आहे.
त्यामुळे पासपोर्ट कार्यालयास पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे जोडल्यामुळे देखील जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन वाढले अशी आशा आहे़ वास्तविक पाहता उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड हे जिल्हे देखील पासपोर्टसाठी सोलापूरला जोडले जावेत यासाठी लोकप्रतिनिधींनी आपले वजन वापरण्याची गरज आहे. सिद्धेश्वर मंदिराशेजारी असलेल्या महापालिकेच्या रिपन हॉल या ऐतिहासिक वास्तूमध्ये पासपोर्ट कार्यालय चे काम सुरू आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे काम पूर्णत्वाच्या दिशेला आहे़ महिनाअखेर पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील अशा पद्धतीने युद्धपातळीवर विविध कामे सुरू आहेत.
रिपन हॉल ही सुमारे १८७० ची इमारत आहे़ महापालिकेने ही इमारत पासपोर्ट विभागाला भाड्याने दिली आहे. मुख्य इमारत सुमारे ५५० फुटांची आहे तर बाहेरील जागा ही सुमारे १४५०० चौरस फुटांची आहे़ पासपोर्ट विभाग सुरू करण्यासाठी या इमारतीमध्ये १ कोटी ४८ लाखांचे इलेक्ट्रिकल्सचे काम, ११५ लाखाचे सिव्हिल वर्क आणि ७५ लाखांचे फर्निचर अशी कामे आहेत़ इलेक्ट्रिकल्स काम, सिव्हिल काम तसेच फर्निचर अशी विविध सुमारे ३२८ कोटी रुपयांची कामे गतीने सुरू आहेत.
२० मे पर्यंत बहुतांश कामे पूर्ण होतील असे नियोजन केले जात आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी़सी़ रेळेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ऋषीकेश कुलकर्णी हे या कामाचे आर्किटेक्ट असून एक साधे होल देखील न पाडता रिपन हॉलच्या इमारतीला नवा साज चढविण्याचा प्रयत्न केला असल्याचे कामातून दिसून येते.
सध्या टॉयलेट बांधकाम, कंपाउंड वॉल, प्लोरींगचे काम, पार्किंग, फर्निचर, वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्षात पासपोर्टचे कार्यालय सुरू होणार आहे़ शहराच्या मध्यवर्ती भागात हे कार्यालय होत असून ही रिपन हॉलची जागा पासपोर्ट विभागाला महापालिकेने भाड्याने दिली आहे़ या कार्यालयामुळे या परिसराची शोभा वाढविली जात आहे.
सोलापूरचे पासपोर्ट कार्यालय हे पाच जिल्ह्यासाठी असेल़ पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातील कोणताही नागरिक या कार्यालयातून पासपोर्ट काढेल़ कार्यालयाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे़ जून महिन्याचे याचे उद्घाटन केले जाईल- अतुल गोतसुर्वे, विभागीय पासपोर्ट अधिकारी
पासपोर्ट कार्यालयाशेजारी अतिक्रमण
शहरातील सर्वांणसुंदर आणि सोलापूरची शोभा ववाढवेल असे सुंदर पासपोर्ट कार्यालय होत असून या कार्यालयाशेजारीच एका व्यक्तीने झोपडी थाटून अतिक्रमण केले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने याकडे लक्ष द्यावे आणि तातडीने हे अतिक्रमण काढावे अशी मागणी पासपोर्ट कार्यालयाने पत्राद्वारे केली आहे़ सर्व सुविधायुक्त पासपोर्ट कार्यालय हे आता सोलापूरची नवी ओळख ठरणार आहे.