पतंगराव : कर्तृत्व आणि आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 02:49 AM2018-03-10T02:49:23+5:302018-03-10T02:49:23+5:30

डॉ. पतंगराव कदम शेतकरी कुटुंबातील सात भावंडांपैकी ते एक; संपूर्ण कुटुंब त्यांनी नावारूपाला आणले. या माणसाचे पाय मात्र नेहमी एकाच ठिकाणी थांबले नाहीत. वादळाप्रमाणे त्यांचा कामाचा झंजावात चालू असायचा. हे वादळ अखेर शमले आहे. त्यांचे कर्तृत्व आणि आठवणींचा आढावा...

Patangrao: Craft and Memories | पतंगराव : कर्तृत्व आणि आठवणी

पतंगराव : कर्तृत्व आणि आठवणी

Next

डॉ. पतंगराव कदम शेतकरी कुटुंबातील सात भावंडांपैकी ते एक; संपूर्ण कुटुंब त्यांनी नावारूपाला आणले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी जे काम केले, तसेच काम सहकारात केले. त्यांनी साखर कारखाने, सूत गिरण्या, सहकारी बँक, सहकारी बझार उत्तम चालविले. राजकारणी म्हणून तर ते अनेक वर्षे धडाडत राहिले. या माणसाचे पाय मात्र नेहमी एकाच ठिकाणी थांबले नाहीत. वादळाप्रमाणे त्यांचा कामाचा झंजावात चालू असायचा. हे वादळ अखेर शमले आहे. त्यांचे कर्तृत्व आणि आठवणींचा आढावा...



दातृत्व, परिश्रम आणि दूरदृष्टी

संपूर्ण महाराष्ट्रातून गोरगरीब व कष्टकरी लोक विविध कामांसाठी डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे येत असत. मुलांचे शिक्षण, नोकºया, कोणाचे आजार, तर कोणाची शासकीय कार्यालयांत अडलेली कामे असे कामांचे नानाविध प्रकार असत. डॉ. कदम कितीही व्यापात असले, तरी अशा लोकांच्या कामात ते तातडीने लक्ष घालत. अपेक्षेने आलेल्या लोकांना मोकळ््या हाती पाठवत नसत.

भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो रुग्णांना सवलतीच्या दरात सेवा मिळत आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या दातृत्वामुळे पैसे नसतानाही अनेकांना जीवदान मिळाले होते. गोरगरीब मुलांना कोट्यवधीची शुल्क सवलत देणारे डॉ. कदम हे दानशूर संस्थापक होते.

अखंड परिश्रम करण्याची तयारी, जबरदस्त आत्मविश्वास आणि दूरदृष्टी ही डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्याची त्रिसूत्री होती. आपण कोठून आलो आहोत अन् ा कोठे जायचे आहे, याचे त्यांना सदैव भान असे.


कामाचा झपाटा विलक्षण

डॉ. पतंगराव कदम यांनी वयाच्या १९व्या वर्षी म्हणजे १० मे १९६४ रोजी पुण्यातील कसबा पेठेतील एका दहा बाय दहाच्या खोलीत ‘भारती विद्यापीठा’ची स्थापना केली. या खोलीत एक जुने टेबल, जुनी खुर्ची, मोडकळीस आलेले एक कपाट, भिंतीवर पुठ्ठ्यावर हाताने लिहिलेला परीक्षा मंत्री असा फलक, खोलीबाहेर दर्शनी भागात भारती विद्यापीठ असा पत्र्याचा बोेर्ड, येणाºयाला बसण्यासाठी मोडकळीस आलेली एक पत्र्याची खुर्ची व एक स्टुल ही भारती विद्यापीठाची सुरुवातीची मालमत्ता. त्यावेळी पुण्यातील वृत्तपत्रांनी व विव्दानांनी बोळात स्थापन झालेले विद्यापीठ बोळातच विसर्जित होणार, अशा बातम्या पसरवल्या. मात्र डॉ. कदम रात्रंदिवस भारती विद्यापीठाच्या विचारात गुंतून पडलेले असायचे. ते कार्यालयात रहायचे. १९९६ पासून विद्यापीठाला अभिमत विश्वविद्यालयाचा दर्जा प्राप्त झाला. विलक्षण जिद्द आणि जबरदस्त महत्त्वाकांक्षा या जोरावर यांनी विद्यापीठाला चैतन्य प्राप्त करून दिले. भारती विद्यापीठाने सुवर्णमहोत्सवी वर्षाचा टप्पा पार केला आहे. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केली आहे. एकूण २१४ शाखांच्या माध्यमातून हा भारती विद्यापीठरूपी ज्ञानयज्ञ सुरू आहे. विद्यार्थ्यांची संख्या लाखांच्या घरात, तर सेवकांची संख्या हजारांच्या घरात पोहोचली आहे. भारती विद्यापीठाच्या रूपाने हजारो तरुणांना कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळाली.


जयंतराव टिळकांचा सल्ला अन् दहा हत्तीचे बळ

पुण्यात एका बोळातील एका खोलीत भारती विद्यापीठ सुरू केले, तेव्हा त्यांना हिणवलं जायचं की, बोळातील विद्यापीठ, बोळातच संपणार! तेव्हा ते अस्वस्थ झाले. केसरीवाड्यात जयंतराव टिळक यांना भेटायला गेले. त्यांना लोकांच्या प्रतिक्रिया सांगितल्या. टिळक म्हणाले, ‘लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत काम करत राहा.’ तसेच केले. विद्यापीठ नावारूपाला आले. ते ‘अभिमत’ही झाले. ते एका ड्रॉइंग शिक्षकापासून कुलपती झाले. जयंतराव टिळक यांचे निधन झाले तेव्हा ते कोल्हापूरचे पालकमंत्री होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक चालली होती. ते बोलत होते. एकाने कानात त्यांना जयंतराव टिळकांच्या निधनाची वार्ता सांगितली. त्यांनी त्याच क्षणी सभा तहकूब केली, श्रद्धांजली वाहिली आणि तडक पुण्याकडे जाण्याची तयारी केली. हेलिकॉप्टर मागविले. ते मुंबईहून कोल्हापूरला येईपर्यंत त्यांना धीर नव्हता. हेलिकॉप्टर साताºयात पोहोचले. त्यांनी तेथे ते उतरविले आणि तिथून ते टिळक यांच्या अंत्यसंस्कारास पोहोचले.
या सर्व गडबडीच्या प्रवासाविषयी त्यांना एकदा विचारले तेव्हा त्यांनी मागे वळून आठवण सांगितली, ‘भारती विद्यापीठ काढल्यावर लोक जे बोलत होते, तेव्हा विद्यापीठ बंद करून शिक्षकी पेशाच करावा, असे वाटण्याइतपत नैराश्य आले होते; पण ‘लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर, काम करीत रहा,’ हा जो सल्ला त्यांनी दिला, त्यावेळी मला दहा हत्तींचे बळ आल्यासारखे वाटले. आयुष्यात त्यांचा एकच सल्ला मला उत्तुंग शिखरावर घेऊन जाण्यास मार्गदर्शक ठरला. त्यांना मी कसा विसरू?’ अशी त्यांची मागे वळून पाहण्याची पद्धत होती.

- सांगलीतील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. उमेश जोशी यांचे वडील पतंगरावांच्या वर्गात (बहुधा चौथीतील) होते. एकदा मंत्री असताना ते भेटायला गेले. सांगलीच्या माधवनगर रस्त्यावरील उमेशच्या दवाखान्यासमोर जाताच त्यांना बघून जणू आपणच चौथीच्या वर्गात आहोत, अशी त्यांनी मिठी मारली आणि दोघेही अरे-तुरे बोलत दहा मिनिटांसाठी आलेले, पण तासभर गप्पा मारल्या.

 - पतंगरावांच्या राजकारणाची चर्चा होते. मात्र ते खरे शिक्षण प्रचारक होते. काम नेटाने करण्यास त्यांचे कायम प्राधान्य असायचे. ते आमदार असोत की नसोत, मंत्री असोत किंवा नसोत; शिक्षण क्षेत्रातील कार्यात केव्हाही खंड पडणार नाही, याची नेहमीच दक्षता ते घेत राहिले. खेड्या-पाड्यांतील मुला-मुलींना शिक्षण देण्यासाठी जे काही करता येईल, त्यासाठी कष्ट घेण्याची त्यांची नेहमीच तयारी असायची. आता जाणवते की, त्यांची लौकिकार्थाने शारीरिक उंची कमी असेल; पण झाड पडल्यावर कळते की ते किती उंच होते, तसे आता जाणवते आहे.


सोनहिरा, उदगिरी कारखान्यांमुळे चांगला दर आणि रोजगार निर्मिती

डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रयत्नातून ताकारी योजनेचे पाणी १८ वर्षापूर्वी कडेगावला मिळाले. शेतीला कायमस्वरुपी पाणी मिळावे व ताकारी योजना सुरळीत सुरु रहावी, यासाठी त्यांनी कारखान्यांच्या व शासनाच्या सहकार्याने प्रयत्न केले.
च्पाणी आल्याने कडेगाव तालुक्यातील शेतकरी ऊस, हळद व द्राक्ष ही नगदी पिके घेऊ लागले. परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले. शेतकºयांचा सर्व ऊस गाळपास जावा यासाठी पतंगरावांनी सोनहिरा आणि उदगिरी या साखर कारखान्यांची उभारणी केली. रास्त दर, त्वरित ऊसबील देण्याची पद्धत, ऊसतोडणीचे काटेकोर नियोजन यामुळे सोनहिरा कारखान्याबाबत सभासद शेतकरी समाधानी राहिले. १ याशिवाय शेजारच्या खानापूर तालुक्यात उदगिरी कारखान्याची उभारणी करून कदम यांनी परिसराचा विकास साधला. सोनहिरा कारखाना सलग १७ वर्षे सक्षमपणे कार्यरत आहे.
याचप्रमाणे पतंगरावांचा उदगिरी शुगर अ‍ॅन्ड पावर प्रोजेक्ट, पारे हा कारखानाही यशस्वी वाटचाल करीत आहे. नवीन असूनही या कारखान्याने चांगला ऊसदर दिला. अन्य कोणत्याही नवीन कारखान्यांच्या तुलनेत सोनहिरा व उदगिरी हे दोन्ही कारखाने ऊसदरात आघाडीवर राहिले.
सुरवातीच्या काळात सोनहिरा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध नव्हता. डॉ. पतंगराव कदम यांनी ताकारी आणि टेंभू योजनेचे पाणी आणले आणि या कारखान्याला कार्यक्षेत्रातच ऊस उपलब्ध झाला.


सांगलीत दोनशे कोटींचे भारती वैद्यकीय संकुल

दिवस होता ८ जानेवारी २००५ चा. पतंगराव कदम यांचा वाढदिवस. सकाळी त्यांच्या सांगलीतील ‘अस्मिता’ बंगल्यावर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या पत्रकारांना बातमी दिली. ‘सांगलीत दोनशे कोटीचे हॉस्पिटल उभारतोय... चला तिकडे...’ असे सांगत सर्वांना मोटारीत बसायला सांगितले. मोटारींचा ताफा मिरज रस्त्यावरील वानलेसवाडी परिसरात थांबला. सगळा उघडाबोडका परिसर. तिथंच पायाभरणीचा समारंभ झाला आणि पाच वर्षांतच त्या जागेवर भव्य भारती वैद्यकीय संकुल उभं राहिलं.
सांगली जिल्ह्यातील गोरगरिबांच्या आरोग्याचा प्रश्नावर पतंगरावांनी तळमळीने भारती रुग्णालयाची उभारणी केली. तब्बल दोनशे कोटी खर्चून अल्पखर्चात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या. सांगली-मिरज रस्त्यावरून जाताना उत्तरेला टोलेजंग इमारती दिसतात. या कॅम्पसकडे पाहिल्यावर पतंगराव कदम यांच्या कर्तृत्वाची साक्ष मिळल्याशिवाय रहात नाही. पतंगरावांच्या जाण्याने आता हा परिसर जणू पोरका झाला आहे.
सांगली... तसं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, नाट्य अशा विविधांगी चळवळीचे केंद्र! मिरजेची वैद्यकीय सेवा तर राज्य आणि परराज्यात पोहोचलेली. सांगली-मिरज रस्त्यावरून जाताना उत्तरेला पाहिले की टोलेजंग इमारतींचा श्रृंखला दिसते. भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय संकुलाची भव्य कमान दिसते. रात्रीच्यावेळी तर विद्युत दिव्यांनी सारा परिसर उजळलेला असतो. गतिमान शिक्षणातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या पतंगराव कदम यांच्या दूरदृष्टीतून आणि झपाटलेपणातून त्याची उभारणी झाली. हजारो गोरगरीब रुग्णांसाठी हे संकुल आधार बनले आहे.
 

Web Title: Patangrao: Craft and Memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.