पतंगराव : भारती विद्यापीठ नावाच्या वटवृक्षाचे संस्थापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 02:25 AM2018-03-10T02:25:19+5:302018-03-10T02:25:19+5:30

कडेगाव तालुक्यातील सोनसळ येथे ८ जानेवारी १९४५ रोजी पतंगराव कदम यांचा जन्म झाला. गावात पहिली ते चौथीपर्यंत एकशिक्षकी शाळा होती. याच शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिरसगाव हायस्कूलमध्ये घेतले.

Patangrao: The founder of the tree called Bharati Vidyapeeth | पतंगराव : भारती विद्यापीठ नावाच्या वटवृक्षाचे संस्थापक

पतंगराव : भारती विद्यापीठ नावाच्या वटवृक्षाचे संस्थापक

googlenewsNext

कडेगाव तालुक्यातील सोनसळ येथे ८ जानेवारी १९४५ रोजी पतंगराव कदम यांचा जन्म झाला. गावात पहिली ते चौथीपर्यंत एकशिक्षकी शाळा होती. याच शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिरसगाव हायस्कूलमध्ये घेतले.आठवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी कुंडल येथे क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांनी स्थापन केलेल्या नाना पाटील बोर्डिंगमध्ये घेतले. तेथे तांबटकाका नावाचे ध्येयवादी अधीक्षक होते. ते धान्य गोळा करून आणायचे आणि बोर्डिंग चालवायचे. पतंगराव कदम यांचे आई-वडीलही या बोर्डिंगसाठी एक पोते ज्वारी देत.
नेत्यांचा प्रभाव
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ डॉ. कदम यांनी लहान वयात अनुभवली.त्यांच्यावर शालेय जीवनातच यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते व वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाचा प्रभाव पडला. त्याकाळी शेकापचा मोठा प्रभाव होता. १९६० मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केल्यावर महाराष्ट्रात काँग्रेस अधिक मजबूत झाली.
तहहयात कुलपती
भारती विद्यापीठाची स्थापना केल्यानंतर त्यांनी एम. ए. एल.एल. बी. पीएच.डी.पर्यंत शिक्षण घेतले. पुढे चारवेळा पुणे विद्यापीठात सिनेटवर निवडून आले. १९८५ मध्ये ते आमदार झाले. यानंतर ते मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून आले आणि भारती विद्यापीठाचे तहहयात कुलपती झाले.
शंकरराव मोरे विद्यालयाची स्थापना
डॉ. पतंगराव कदम यांनी १९६८ मध्ये पुणे येथेच शंकरराव मोरे विद्यालय सुरू केले. त्यावेळी पुण्यात पौड फाट्याच्या पुढे एकही घर नव्हते. या फाट्याच्या अलीकडे एक माजी सैनिक कॉलनी होती. या कॉलनीजवळच्या जागेत हे विद्यालय सुरू झाले. या शाळेत पहिल्यांदा ३६ विद्यार्थी होते.
पुणे विद्यापीठाच्या मॅनेजिंग कौन्सिलवर
महाराष्टÑ सरकारने विद्यापीठांचा कायदा बदलला आणि पदवीधरांमधून, संस्थांमधून, प्रचार्यांमधून विद्यापीठावर लोक निवडून जाऊ लागले. पुणे विद्यापीठात त्यावेळी पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार अशा जिल्ह्याचा समावेश होता. डॉ. पतंगराव कदम पदवीधर गटामधून उभे राहिले आणि सिनेटवर (मॅनेजमेंट कौन्सिल) निवडून आले. त्यानंतर ते चारवेळा पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलवर निवडून आले.
तीन महाविद्यालयांची स्थापना
पुणे विद्यापीठाच्या मॅनेजिंग कौन्सिलचा कारभार माहिती करून घेतला आणि १९७३ मध्ये एरंडवणे (पुणे) येथे तीन महाविद्यालये सुरू केली. पहिले कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, दुसरे लॉ कॉलेज व तिसरे मॅनेजमेन्ट इन्स्टिट्यूट काढले.
शाखा विस्तार
गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन हे ध्येय मनात ठेवून पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाचे स्वर्गीय यशवंतराव मोहिते तहहयात अध्यक्ष होते. ५४ वर्षांमध्ये भारती विद्यापीठ ही अग्रगण्य संस्था म्हणून गणली जात आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक ते पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण देणाºया १७९ शैक्षणिक शाखा आहेत. धनकवडी, पुणे, एरंडवणे, पुणे, दिल्ली, नवी मुंबई, सांगली, कोल्हापूर, कडेगाव अशा ७ शहरात १० शैक्षणिक संकुले आहेत. ४१ देशातील ८०० हून अधिक परदेशी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे, तर २० लाखांहून अधिक माजी विद्यार्थी आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंतचिकित्सा, व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, हॉटेल व्यवस्थापन, विधी, सामाजिक शास्त्रे, समाजकार्य, वास्तुरचना शास्त्र, पर्यावरण शास्त्र, शारीरिक शिक्षण, दृश्य कला, कृषी, जैविक तंत्रज्ञान, नेत्रविद्या, श्रवण शास्त्र, छाया चित्रकला आदी अभ्यासक्रम भारती विद्यापीठात शिकवले जातात.
दुबई, अमेरिकेतही केंदे्र
डॉ. पतंगराव कदम यांनी दुबईत काही शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अमेरिकेतही भारती विद्यापीठाने मराठी शिक्षणाची ४० केंद्रे सुरू केली आहेत. तेथील मराठी बांधवांचा तसा आग्रह होता.

Web Title: Patangrao: The founder of the tree called Bharati Vidyapeeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.