पतंगराव कदम यांची राजकीय कारकीर्द आणि अल्पपरिचय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 10:50 PM2018-03-09T22:50:55+5:302018-03-09T23:28:14+5:30
40 हून अधिक वर्षे ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. पश्चिम महाराष्ट्रातील 'लोकनेता' म्हणूनही त्यांचा गौरव झाला.
मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने मुंबईतील लीलावती रुग्णालयात शुक्रवारी निधन झाले; ते 73 वर्षांचे होते. पतंगराव कदम यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.
राजकीय कारकीर्द - काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून धडपडणारा एक छोटा कार्यकर्ता १९८० मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि दोन-अडीचशे मतांनी पराभूत झाले. ही पहिलीच निवडणूक होती. सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भरभक्कम होती, तेव्हा अपक्ष निवडणूक लढविण्याचे धाडसच आहे. पराभव झाला म्हणून खचून जाणारे ते पतंगराव कदम नव्हते. १९८५ मध्ये पुन्हा लढत दिली आणि आमदार झाले. तेव्हापासून १९९५ चा अपवाद वगळला तर सहावेळा निवडून आले. राजकारणात यशामागून यश मिळत असताना गावची कामं करणे कधी सोडले नाही. वास्तविक, पतंगराव कदम यांच्या राजकारणाची अधिक चर्चा होते; पण ते खरे शिक्षण प्रचारक-प्रसारक आहेत. सामान्य माणसांच्या घरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे, यासाठी १९६७ मध्ये स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाचा प्रचंड विस्तार वाढत राहिला. सहकारातील त्यांच्या कामाची चर्चा कमी होते. त्यांनी बँक, सूत गिरण्या, साखर कारखाने स्थापन केले. या सर्व संस्था उत्तम चालविल्या आहेत. त्यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त सांगलीत निवडक पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते, मला सांगलीत भव्यदिव्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करायचे आहे. तो शब्द खरा करण्यासाठी केवळ एकच वर्ष लागले. २००५ मध्ये ६१ व्या वाढदिवसाच्या वेळी त्यांनी ५० एकरांवरील वैद्यकीय महाविद्यालयाचा पाया खोदला. बारा वर्षांत त्या जागेवर शंभर कोटी रुपयांचा वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर फुलला आहे. उत्तम सेवा, गरिबांना आधार देणाऱ्या योजना येथे सुरू आहेत. 1968 साली ते एसटी महामंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले आणि तेव्हापासून गेली 40 हून अधिक वर्षे ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. पश्चिम महाराष्ट्रातील 'लोकनेता' म्हणूनही त्यांचा गौरव झाला.
पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय
पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोंसल या गावी झाला. गावात शाळा नसल्या कारणाने पतंगरावांना 4 ते 5 किमी चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घ्यावं लागत असे. पुढे पलूस तालुक्यातील कुंडल गावातून ते दहावी उत्तीर्ण झाले. दहावीनंतर त्यांनी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रातील सेवेची बिजं याच संस्थेत त्यांच्यामध्ये रुजली. 1961 साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले. 1964 साली वयाच्या 19 व्या वर्षी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली.
असा होता राजकीय प्रवास
- जून 1991 -मे 1992 - शिक्षण राज्यमंत्री
- मे 1992 - 1995 - शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते)
- ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 - उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री
- नोव्हेंबर 2004 पासून पुढे - पुनर्वसन आणि मदतकार्ये या खात्यांचे मंत्री
- प्रभारी अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
- डिसेंबर 2008 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - महसूल, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण
- मार्च 2009 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन महसूल खाते
- नोव्हेंबर 2009 पासून पुढे - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - वनविभाग
- 19 नोव्हेंबर 2010 ते 2014 - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य - वनविभाग, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन