लंडनसाठी ‘सिंग साहब’ बनले ‘पटेल’
By admin | Published: June 8, 2017 02:20 AM2017-06-08T02:20:58+5:302017-06-08T02:20:58+5:30
दोन पंजाबी नागरिकांनी लंडनचा व्हिसा मिळविण्यासाठी ‘सिंग’ वरून स्वत:चे नाव ‘पटेल’ असे बदलत
गौरी टेंबकर - कलगुटकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दोन पंजाबी नागरिकांनी लंडनचा व्हिसा मिळविण्यासाठी ‘सिंग’ वरून स्वत:चे नाव ‘पटेल’ असे बदलत, त्या नावाने पासपोर्ट बनवला. मात्र, आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांची भाषा आणि वेशभूषेमुळे ते सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडले आणि सहार पोलिसांनी मंगळवारी त्यांना अटक केली.
सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी मघरसिंग (३०), आणि त्याचा अन्य एक मित्र आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिंगापूरला निघाले होते. मात्र, सिक्युरिटी काउंटरवर कागदपत्रांची पडताळणी करताना पासपोर्टवर त्यांचे नाव त्यांनी ‘पटेल’ असे लिहिले होते. मात्र, त्यांची भाषा आणि काही प्रमाणात वेशभूषा ही संबंधित अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटली. त्यामुळे त्यांनी या दोघांची चौकशी केली. ज्यात आम्ही ‘पटेल’ नसून, ‘सिंग’ असल्याचे त्यांनी कबूल केले. त्यानुसार त्यांना सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हे दोघे पंजाबचे राहणारे असून २००९मध्ये ते सिंगापूरला टुरिस्ट व्हिसावर जाऊन आले होते. कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणाऱ्या दोघांना लंडनमध्ये कायमचे वास्तव्यास जायचे होते. त्यामुळे त्यांनी हा बनावट पासपोर्ट बनवल्याचे सहार पोलिसांना सांगितले आहे. त्यांना बुधवारी स्थानिक न्यायालयात नेले असता, १२ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
>एजंट म्हणाला म्हणून...
अहमदाबाद पासपोर्ट आॅफिसमध्ये हे दोघे एका एजंटला भेटले. जिथे त्यांनी आधार कार्ड आणि लिव्हिंग सर्टिफिकेट देऊन पासपोर्ट बनविला. पंजाबी लोकांना लंडनमध्ये नोकरीसाठी प्रवेशबंदी असल्याने त्यांनी यावर पटेल, असे आडनाव लावले. मात्र, हा पासपोर्ट कोरा असल्याने एखादी तरी व्हिसा एन्ट्री त्यावर असणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी याच पासपोर्टमार्फत सिंगापूरला जाण्याचे ठरविले. ज्यामुळे पासपोर्टवर एन्ट्री होईल आणि पुढे तोच पासपोर्ट लंडनला जाण्यासाठी वापरता येईल आणि कोणालाही संशय येणार नाही. तसेच पुढे तेथे नागरिकत्वही तुम्हाला मिळेल, असे एजंटने दोघांना सांगितले. याला बळी पडत दोघांनी बनावट पासपोर्ट बनविल्याचे पोलिसांना सांगितले.