एमपीएससीच्या सदस्यपदी पटेल
By admin | Published: July 1, 2014 10:54 PM2014-07-01T22:54:24+5:302014-07-02T00:43:45+5:30
आयोगासमोर मुलाखत देणारा आयोगाच्याच सदस्यपदी आरूढ
जळगाव जामोद : जळगाव जामोद तालुक्यातील पळशी वैद्य येथील मूळ निवासी अँड.हमीद पटेल यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदापर्यंंत पोहचणारे बुलडाणा जिल्ह्यातील ते पहिले ठरले आहेत. राज्य शासनाच्या अप्पर सचिव पदासाठी ज्या आयोगासमोर अँड. हमीद पटेल यांनी २५ वर्षांपूर्वी मुलाखत दिली होती, त्याच आयोगाच्या सदस्यपदी आरूढ होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
यापुर्वी अँड. हमीद पटेल हे विधी, न्याय व सांसदीय कार्य विभागाच्या प्रधान सचिव पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या रुपाने या जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या अध्यक्ष आणि सदस्य या पदांवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच राज्याचे परिवहन आयुक्त विठ्ठल मोरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव अँड.हमीद पटेल यांची सदस्य म्हणून निवड आयोगावर नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या विविध खात्यांचे अधिकारी निवड करण्याचे काम एमपीएससीव्दारे केले जाते. २५ वर्षापूर्वी याच आयोगासमोर अप्पर सचिव पदासाठी अँड.हमीद पटेल यांनी मुलाखत दिली होती. त्यावेळी दोन अप्पर सचिवाची केवळ पदे भरावयाची होती. त्याकरिता तब्बल दोन दिवस मुलाखतीची प्रक्रीया चालली होती.
त्यानंतर अँड.पटेल यांची निवड करण्यात आली होती. आता २५ वर्षानंतर अँड.हमीद पटेल यांचीच या आयोगावर सदस्यपदी निवड झाली आहे. सदस्यपदाची नियुक्ती चार वर्षाकरिता करण्यात आली आहे.