'भाजपाने साडेतीन लाख कोटी मागितल्यानेच पटेलांचा राजीनामा'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 02:07 AM2018-12-11T02:07:33+5:302018-12-11T06:47:05+5:30
भारतीय जनता पार्टीने पक्षासाठी आरबीआयकडून साडेतीन लाख कोटी रुपये मागितल्यानेच दबावातून रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी येथे केला.
परभणी : भारतीय जनता पार्टीने पक्षासाठी आरबीआयकडून साडेतीन लाख कोटी रुपये मागितल्यानेच दबावातून रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी येथे केला.
गर्व्हनर उर्जित पटेल यांना भाजपाला पैसे द्यायचे नव्हते. त्यामुळे दबावातून त्यांनी सरकारशी पंगा कशाला घ्यायचा म्हणून सरकारला पैसा देण्याऐवजी घरी जाणे पसंद केले. यावरुन भाजपा सरकार सत्तेचा दुरुपयोग करुन स्वायत्ता संस्थांना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी किती धडपड करीत आहे, हे दिसून येते, असे ते म्हणाले.
जगातला कोणताही अर्थतज्ज्ञ आपल्या देशासाठी आर्थिक सल्लागार म्हणून काम करण्यास तयार नाही. देशातल्या सर्व लोकशाही संस्था स्वत:च्या ताब्यात घेण्याचा मोदी-जेटली यांचा प्रयत्न आहे. रिझर्व्ह बँकेला सरकारी विभाग बनवून टाकले आहे. त्यांच्या साडेतीन लाख कोटी गंगाजळीचा वापर देशाच्या गंगाजळीत आणण्याचा हेतू ठेवून हे केले गेले. रिझर्व्ह बँकेवर राजकीय व्यक्तीच्या नेमणुका केल्या गेल्या. गुरुमूर्तींचा उर्जित पटेल यांना हूसकावून लावण्याचे काम दिले त्यात ते यशस्वी झाले. आज हा चौथा हल्ला झाला आहे. याआधी अरविंद सुब्रमण्यम, रघुराम राजन, अरविंद पानगढिया आणि आता उर्जित पटेल. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मोदी आणि जेटलींच्या हाताखाली काम करायला तयार नाहीत.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची चर्चा काही दिवस सुरू होती. त्यांनी तो अखेरीस दिला. आता परत नवीन व्यक्ती शोधण्यापेक्षा केंद्र सरकारने सर्व यंत्रणा आपल्याच ताब्यात घेऊन टाकाव्यात.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
सरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे. विजय माल्या हा भाजपा सरकारचा प्रतिमा रक्षक होऊ शकत नाही. भाजपाच्या होऊ घातलेल्या पराभवाचा माल्या साक्षात्कार आहे. विजय माल्या भारतात असतानाही पैसे देण्यास तयार होता, मग त्यावर पळून जायची वेळ कोणी आणली? आता निरव मोदी आणि चोकसी सारख्या लोकांचे काय? आता काही झाले तरी सरकार आपली प्रतिमा राखू शकणार नाही.
- राज ठाकरे, मनसे अध्यक्ष