दुर्गदुर्गेश्वर रायगडचा पायरी मार्ग खडतर

By admin | Published: April 4, 2017 03:41 AM2017-04-04T03:41:31+5:302017-04-04T03:41:31+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३७ व्या पुण्यतिथीनिमित्त शेकडो शिवभक्त रायगडावर जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत

The path to Durgadurgeshwar Raigad is difficult | दुर्गदुर्गेश्वर रायगडचा पायरी मार्ग खडतर

दुर्गदुर्गेश्वर रायगडचा पायरी मार्ग खडतर

Next

नामदेव मोरे,
नवी मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३७ व्या पुण्यतिथीनिमित्त शेकडो शिवभक्त रायगडावर जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेचा सोपा मार्ग असला तरी इतिहासप्रेमी नागरिक पायी जाण्यास अधिक पसंती देत आहेत, परंतु किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांची झालेली दुरवस्था, मार्गामध्ये बैठक व्यवस्थेचा अभाव असल्याने गड चढणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. विशेषत: महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना खूपच त्रास होत असून, या मार्गाची डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे.
रायगड हा शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार. मराठा साम्राज्याची राजधानी. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार, वास्तुकलेचे उत्तम उदाहरण. महाराजांची समाधी व समुद्रसपाटीपासून जवळपास २९०० फूट उंची यामुळे शिवप्रेमींना रायगड नेहमीच खुणावत असतो. तब्बल १४३५ पायऱ्या व त्याव्यतिरिक्त तेवढ्याच अंतराच्या पायवाटेने पायपीट करून गडावर जाणे अनेकांना शक्य होत नसल्याने रोपवे सुरू केला आहे. दहा मिनिटांत गडावर जाणे शक्य झाले असले तरी गडाचे महत्त्व समजून घेण्यासाठी पायीच जाणे आवश्यक आहे. रविवार व इतर सुटीच्या दिवशी ५०० ते १ हजार नागरिक पायवाटेचा अवलंब करत आहेत. पण गडावर जाणाऱ्या या शिवप्रेमींची वाट व्यवस्थित नसल्याने प्रचंड गैरसोय होत आहे. पायथ्याला पायऱ्या सुरू झाल्यानंतर सरळ चढण चढावे लागत आहे. पायऱ्यांची उंचीही खूप आहे. प्रत्येक पायरीची उंची व आकार समान नसल्याने चालण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अनेक जण २०० ते ४०० पायऱ्या चढून गेल्यानंतर भीतीनेच खाली उतरू लागले आहेत. एका दमात गड चढणे जवळपास अशक्य आहे. यामुळे वाटेने ठिकठिकाणी क्षणभर विश्रांती घेवून पर्यटक पुढील वाट चालू लागतात. वास्तविक मार्गावर प्रत्येक ५० ते १०० मीटर अंतरावर बसण्यासाठी आसनव्यवस्था किंवा कट्टा बांधण्याची आवश्यकता आहे.
उन्हाळ्यात उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी व पावसाळ्यात पावसापासून बचाव व्हावा यासाठी निवारा शेड उभारणे आवश्यक आहे. पण सद्यस्थितीमध्ये अत्यंत कमी ठिकाणी एखादा बसण्यासाठी सिमेंटचा कट्टा तयार केला असून, त्यामधील अर्धे तुटले आहेत.
गडाच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावरील पायऱ्या पूर्णपणे तुटलेल्या आहेत. सर्व दगड निखळून गेले आहेत. यामुळे चालण्यास त्रास होत आहे. पायवाट काही ठिकाणी अत्यंत चिंचोळी आहे. गडावरील राज्याभिषेक सोहळा, महाराजांची जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी गडावर हजारो शिवभक्त हजेरी लावतात. अशावेळी चिंचोळ्या वाटेतून मार्ग काढताना त्रास होत आहे.
पायऱ्यांची उंची जास्त व दोन पायऱ्यांमध्ये अंतर कमी असल्याने वरची पायरी चढताना उतरताना त्रास होत आहे. गडावर पायी जाणाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी या मार्गाची डागडुजी करणे आवश्यक असल्याचे मत शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.
पायऱ्यांचे दगड निखळले
रायगडावर जाणाऱ्या पायऱ्यांचे दगड अनेक ठिकाणी निखळले आहेत. पायऱ्या फक्त नावालाच शिल्लक आहेत. यामुळे पायी जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे. पायऱ्यांची डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
ँरायगडावर जाण्यासाठी १४३५ पाऱ्या असून या दुरवस्थेमुळे पर्यटकांना त्रास होत असून प्रचंड गैरसोय होत आहे.
पायऱ्यांचा आकार
गडावर जाणाऱ्या मार्गावरील पायऱ्यांची उंची व आकार यामध्ये खूप फरक आहे. काही ठिकाणी पायऱ्या खूपच उंच आहेत. चढताना प्रचंड दम लागत आहे. उतरतानाही शरीराचा तोल सांभाळावा लागत आहे. यामुळे पूर्ण पायरी मार्गाची एकाचवेळी दुरुस्ती करून पायऱ्यांची उंची, लांबी व आकार यामधील फरक दूर करून चालण्यायोग्य पायऱ्या बनविण्याची मागणी केली जात आहे.
रोपवेने दहा मिनिटांत गडावर जाणे शक्य झाले असले तरी गडाचे महत्त्व समजून घेण्यासाठी पायीच जाणे आवश्यक आहे.
पायऱ्यांची उंचीही खूप आहे. प्रत्येक पायरीची उंची व आकार समान नसल्याने चालण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अनेक जण २०० ते ४०० पायऱ्या चढून गेल्यानंतर भीतीनेच खाली उतरू लागले आहेत.

Web Title: The path to Durgadurgeshwar Raigad is difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.