देहूगावातून पालखी मार्गस्थ

By Admin | Published: June 29, 2016 01:44 AM2016-06-29T01:44:21+5:302016-06-29T01:44:21+5:30

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करीत पालखी देहूनगरीच्या वेशीतून बाहेर पडून पंढरीरायाच्या भेटीसाठी मंगळवारी मार्गस्थ झाली.

The Pathak route from Dehuagawa | देहूगावातून पालखी मार्गस्थ

देहूगावातून पालखी मार्गस्थ

googlenewsNext


देहूगाव : मुखी हरिनामाचा जप, हातात वीणा, टाळ व मृदंगाच्या तालावर पडणारी पावले, वरुण राजाचा जलाभिषेक अंगावर घेत ‘बोला पुंडलिका वरदे’चा मंत्रोच्चार करीत तुतारी, संबळ, ताशा या पारंपरिक वाद्यासह, सावलीचे छत्र, अब्दागिरी, गरुडटक्के घेऊन श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करीत पालखी देहूनगरीच्या वेशीतून बाहेर पडून पंढरीरायाच्या भेटीसाठी मंगळवारी मार्गस्थ झाली.
सोहळ्यात राज्यातील लाखो भाविक सहभागी झाले आहेत. राज्यात दुष्काळी परिस्थिती असली, तरी आपल्या श्रद्धा कायम ठेवत दुष्काळ महत्त्वाचा नसून, इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याची प्रचिती आज देहूनगरीत आली. भाविक, वैष्णवांचा जनसागर आज पंढरीरायाच्या भेटीसाठी शासकीय महापूजेनंतर सकाळी अकराच्या सुमारास इनामदारवाड्यातून मार्गस्थ झाला. या वेळी काही मिनिटे पावसाने हजेरी लावली. वाड्यात सकाळी नऊच्या सुमारास शासकीय महापूजेला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी सौरव राव, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव व जयश्री जाधव, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते महापूजा झाली. या वेळी प्रांताधिकारी स्नेहल बर्गे, तहसीलदार किरणकुमार काकडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, सदस्य रत्नमाला तळेकर, शुभांगी राक्षे, गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर, मंडलाधिकारी सूर्यकान्त पाटील, सरपंच हेमा मोरे, ग्रामपंचायत सदस्य, प्रकाश हगवणे आदी उपस्थित होते.
पालखी गावाच्या प्रवेशद्वार कमान वेशीत येताच पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखीने प्रदक्षिणा घालून पंढरीकडे वाटचाल केली. हिंदू-मुस्लीम ऐक्याचा महामेरू ठरलेल्या संत तुकाराममहाराजांची पालखी पहिल्या अभंग आरतीला कापूरओठा येथील अनगडशहा वली दर्ग्याजवळ असलेल्या पादुकास्थान मेघडंबरी येथे थांबली. येथे प्रथेप्रमाणे अभंग व समाज आरती भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, बाळासाहेब नेवाळे, विष्णू खांदवे यांच्या उपस्थितीत झाली. समाज आरतीनंतर पालखी रथामध्ये ठेवली. तेथून पालखी आकुर्डीच्या मुक्कामाकडे रवाना झाली.
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्याच्या वीणेकऱ्यांचा सन्मान ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. या वेळी सरपंच हेमा मोरे, उपसरपंच सचिन साळुंके, हेमा काळोखे, अभिजीत काळोखे, सुनीता टिळेकर,सचिन विधाटे, स्वप्निल काळोखे, दीपाली जंबुकर, उषा चव्हाण, राणी मुसुडगे, नीलेश घनवट, रत्नमाला करंडे यांच्यासह आजी-माजी सदस्य उपस्थित होते. पालखी मार्गावर ठिकठिकाणी अन्नदान, चहा, नाष्ट्याचे वाटप करण्यात येत होते. येथील शिरीष कुमार मित्र मंडळाने नाष्टा दिला, तर अ‍ॅड. सुनील काळोखे यांच्या कुटुंबीयांनी चहाचे वाटप केले. ठिकठिकाणी पिण्याचे पाणी वाटप करण्यात येत होते.
ग्रामपंचायतीचे सफाई कामगार रस्त्यावर पडलेला कचरा तातडीने उचलून डब्यांमध्ये जमा करून त्वरित सफाई करून घेत होते. त्यामुळे पालखी मार्गावर कोठेही कचरा दिसून आला नाही. येथील रोटरी क्लब आॅफ देहूगाव यांच्या वतीने वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी प्लॅस्टिकचे कागद वाटण्यात आले. चिंचोली येथील दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी श्री शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी दिंडी घेऊन सहभागी झाले होते. त्यांच्या समवेत प्राचार्य दत्तात्रय शितोळे, नागेश माहुले, प्रवीण गाणबोटे, रंजना सपकाळे, माधुरी खालकर, मंगल सूर्यवंशी सहभागी झाले.(वार्ताहर)

Web Title: The Pathak route from Dehuagawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.