पथदिव्यांचे ढिसाळ नियोजन
By admin | Published: April 26, 2016 02:42 AM2016-04-26T02:42:42+5:302016-04-26T02:42:42+5:30
महापालिकेच्या गलथानपणामुळे पथदिव्यांची देखभाल आणि विद्युत देयकांपोटी कोट्यवधी रुपये खर्ची घातले जात आहेत.
कमलाकर कांबळे,
नवी मुंबई- महापालिकेच्या गलथानपणामुळे पथदिव्यांची देखभाल आणि विद्युत देयकांपोटी कोट्यवधी रुपये खर्ची घातले जात आहेत. या प्रकाराकडे महापालिकेच्या संबंधित विभागाने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याने वीज बचतीच्या धोरणाला हरताळ फासला गेल्याचे दिसून आले आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ४0 हजार ९५८ पथदिवे आहेत. हे पथदिवे चालू आणि बंद करण्यासाठी यांत्रिकी पध्दतीचा अवलंब करण्यात येतो. यात पथदिवे चालू करण्याची व बंद करण्याची वेळ नमूद करण्यात आलेली असते. त्यामुळे सायंकाळच्या वेळी ठरलेल्या वेळेत हे पथदिवे आपोआप चालू होतात, तर सकाळच्या वेळी नमूद वेळेत बंद होतात. असे असले तरी अनेक विभागाचे वेळेचे हे गणित विस्कळीत झाल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी सूर्यास्ताअगोदरच दिवे लागतात. काही भागात सूर्योदयानंतरही दिवे चालू असल्याचे पाहावयास मिळते. या प्रकारामुळे विजेचा अतिरिक्त वापर होत आहे. विशेष म्हणजे त्यामुळे वीज बिलातही वाढ होत आहे.
महापालिका शहरातील पथदिव्यांची देखभाल व वीज बिलापोटी वर्षाला २५ कोटी ६५ लाख रुपये खर्च करते. यात केवळ विद्युत बिलावर १७ कोटी ४0 लाख ८८ हजार रुपये खर्च होतात. याचाच अर्थ महिन्याला साधारण दीड कोटी रुपये खर्च केले जात असल्याची बाब माहितीच्या आधिकारातून उघड झाली आहे. वास्तविकपणे हा खर्च अवास्तव असून केवळ संबंधित विभागाच्या गलथानपणामुळे प्रशासनाला अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते सुधीर दाणी यांनी केला आहे.
पथदिव्यांच्या देखभालीसाठी वर्षाला आठ कोटी २४ लाख ४९ हजार रुपये खर्च केले जातात. विशेष म्हणजे शहराच्या अनेक भागातील विद्युत दिवे बंद अवस्थेत आहेत. झोपडपट्टी परिसरातील विद्युत खांबांचीच दुरवस्था झाली आहे.