पॅथॉलॉजी लॅबमालकांना अटक
By Admin | Published: June 29, 2016 01:59 AM2016-06-29T01:59:08+5:302016-06-29T01:59:08+5:30
निलंबित झालेल्या डॉक्टरच्या नावाने अहवाल देणाऱ्या नवी मुंबईच्या दोन पॅथॉलॉजी लॅबच्या चालकांना पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : अप्रशिक्षित व्यक्तीकडून रक्त, मूत्र तपासणी करून घेतल्यामुळे निलंबित झालेल्या डॉक्टरच्या नावाने अहवाल देणाऱ्या नवी मुंबईच्या दोन पॅथॉलॉजी लॅबच्या चालकांना पोलिसांनी अटक केली आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध महाराष्ट्र असोसिएशन आॅफ पॅ्रक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टने गुन्हा दाखल केला होता.
घणसोली येथील संकल्प लॅबोरेटरीचे मालक सागर माळी, मेघा माळी आणि कोपरखैरणेच्या सेक्टर ५ येथील आयुष लॅबच्या संतोष खांबळकर यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही लॅबमधून मिळणाऱ्या अहवालांमध्ये डॉ. एस. एन. त्रिपाठी या डॉक्टरच्या सह्या होत्या. प्रत्यक्षात या डॉक्टरला निलंबित करण्यात आलेले आहे. त्यामुळे या डॉक्टरच्या सह्या अहवालावर येऊ शकत नाहीत.
या दोन लॅबव्यतिरिक्त नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे परिसरातील लॅबमध्ये या डॉक्टरच्या सह्या असलेले अहवाल मिळत असल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.
या प्रकरणावरून मुंबईत सुरू असलेला बोगस पॅथॉलॉजीचा धंदा तेजीत असल्याचे उघड झाले आहे. प्रशिक्षित नसणारी व्यक्ती रक्त, मूत्र, बॉडी फ्लुइडची तपासणी करून आजारांचे निदान करत आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी दिली. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मदत केली असून, डॉ. त्रिपाठींवरही कारवाई होणार असल्याचे डॉ. यादव यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)