मुंबईत रुग्णांची वणवण
By admin | Published: March 22, 2017 02:00 AM2017-03-22T02:00:52+5:302017-03-22T02:00:52+5:30
गेल्या २४ तासांत राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे रुग्णसेवा बेहाल झाल्याचे दिसून येत आहे.
मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे रुग्णसेवा बेहाल झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील शहर-उपनगरातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची वणवण झालेली दिसून आली. काही रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग बंद दिसून आले, तर काही ठिकाणी निवासी डॉक्टर कामावर नसल्याने रुग्णालय आवारात एकच गर्दी दिसून आली.
मुंबई शहर-उपनगरातील रुग्णालयांमध्ये नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. राज्यात धुळे, नाशिक, औरंगाबाद आणि मुंबईतील शीव, वाडिया रुग्णालयांत डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांमुळे निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन केले आहे. यामुळे शहर-उपनगरातील काही रुग्णालयांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्याचे दिसून आले. मुंबईत जे.जे. रुग्णालयात मंगळवारी रुग्णसेवेवर कोणताही परिणाम न झाल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. डॉ. लहाने यांनी सांगितले की, जे.जे. रुग्णालयात दररोज सरासरी १५५ शस्त्रक्रिया होतात, मात्र मंगळवारी १६६ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. तर केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, रुग्णालयात मंगळवारी लहान-मोठ्या अशा एकत्रितपणे ६३ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या सामूहिक रजेमुळे दिवसभरात ५० शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
वाट पाहून खासगी रुग्णालय गाठले
आजीची प्रकृती काहीशी खालावल्याने सायन रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेलो होतो. मात्र डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे रुग्णालय आवारातील रुग्णांची गर्दी, डॉक्टरांची कमतरता यामुळे बराच काळ वाट पाहत बसावे लागले. अखेरीस खासगी रुग्णालयात जावे लागले, असे सायन रुग्णालयातील रुग्ण मंगेश खैरनांगर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)