रुग्णांसाठी देवदूत असलेले नि:स्वार्थ डॉक्टर

By admin | Published: November 7, 2014 12:45 AM2014-11-07T00:45:20+5:302014-11-07T00:45:20+5:30

डॉक्टरांच्या अंगी हा वेगळेपणा कुठून आला हे जाणून घ्यायचे असेल तर आधी थेट त्यांच्या बालपणात शिरावे लागेल़ अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार हे त्यांचे मूळ गाव़ चांदूरात त्याकाळी गुळाची मोठी

In-patient doctor for patients with diarrhea | रुग्णांसाठी देवदूत असलेले नि:स्वार्थ डॉक्टर

रुग्णांसाठी देवदूत असलेले नि:स्वार्थ डॉक्टर

Next

नागपूर : डॉक्टरांच्या अंगी हा वेगळेपणा कुठून आला हे जाणून घ्यायचे असेल तर आधी थेट त्यांच्या बालपणात शिरावे लागेल़ अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार हे त्यांचे मूळ गाव़ चांदूरात त्याकाळी गुळाची मोठी बाजारपेठ होती़ (म्हणूनच असेल कदाचित गुळाचा हा गोडवा डॉक्टरांच्या ठायी सदैव जाणवत असतो़) डॉक्टरांचे वडीलही हाच व्यवसाय करायचे़ सहाव्या वर्गापर्यंतचे शिक्षण चांदूरात झाले़ पुढच्या शिक्षणासाठी बहीण व जावयाच्या आग्रहावरून ते नागपुरात आले आणि नागपूरचेच झाले़ ६० च्या दशकाचा तो काळ होता़ बहिणीचे घर त्यावेळी महालात होते आणि हा परिसर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने भारलेला होता़ समोरच शाखा भरायची़ समाजऋण, राष्ट्राभिमान या जड शब्दांचे अर्थही कळत नसलेल्या त्या वयात डॉक्टरांनी शाखेत पहिले पाऊल टाकले़ ही मंडळी काहीतरी चांगले करीत आहेत व चांगल्या कार्याला आपण साथ दिली पाहिजे, हे आपले संस्कार आहेत या एकाच भावनेतून ते संघात आले आणि पुढे संघच त्यांचे जीवन झाले़ शाखेतील त्यांचे सर्व मित्र कोणाच्याही मदतीच्या हाकेला पहिला प्रतिसाद द्यायचे़ कोणाला रुग्णालयात पोहोचवायचे असेल वा कुणाचे निधन झाले असेल तर डॉक्टर व त्यांचे सहकारी सदैव सज्ज असायचे़यातूनच सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली़ दहावी झाल्यावर खरंतर डॉक्टरांना शिक्षक व्हायचे होते़ परंतु जावई होमिओपॅथीचे डॉक्टर असल्याने त्यांना विलासने डॉक्टर व्हावे असे वाटायचे़ अखेर जावयांच्या आग्रहापुढे डॉक्टरांना नमते घ्यावे लागले व पहिल्यांदा त्यांचा सामना होमिओपॅथीशी झाला़ आंदोलनं, चळवळींचा तो भारावलेला काळ होता़ रक्तातच चळवळीची बीजे असल्याने डॉक्टरही स्वत:ला या आंदोलनांपासून वेगळे ठेवू शकले नाहीत़
विद्यार्थी परिषदेचे काम असो की जनसंघाचे, त्याकाळी होमिओपॅथी कॉलेज बंद ठेवायचे असेल तर पहिली आठवण डॉक्टरांची व्हायची़ डॉक्टरांचे नियोजन कौशल्य विद्यापीठाच्या निवडणुकांमध्येही नागपूरने अनुभवले़ डॉ़ श्रीकांत जिचकार, सुधाकर गणगणे यासारख्या मातब्बर मंडळींशी सामना असायचा़ पुढे देशात आणीबाणी लागली आणि डॉक्टरांच्या जावयांना मिसा अंतर्गत कारागृहात जावे लागले़ हीच घटना डॉक्टरांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली़ जावई कारागृहात, त्यांच्या रुग्णालयाची जबाबदारी डॉक्टरांवर आली आणि वेदनांनी विव्हळत येणारा रुग्ण आपल्या औषधांनी बरा झाल्यावर कसा आनंदाने रुग्णालयाबाहेर जातो हे डॉक्टरांनी बघितले आणि रुग्णाच्या चेहऱ्यावरचा हा आनंद हेच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय असले पाहिजे, याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांनी रुग्णसेवेत स्वत:ला वाहून टाकले़ पुढे तर नागपुरातील सुरेंद्रनगर हा परिसरच डॉक्टर डांगरे यांच्या नावामुळे ओळखला जाऊ लागला़ त्यांच्या हाताला मोठे यश लाभले़ अ‍ॅलोपॅथीचा बोलबाला असलेल्या या काळात डॉक्टरांकडची होमिओपॅथी औषध घेण्यासाठी राज्य, देशच नव्हे तर विदेशातूनही लोक यायला लागले़ सूर्य उजाडताच त्यांच्या रुग्णालयात गर्दी व्हायची व दुपारी ते बंद व्हायच्या आधीच पुन्हा संध्याकाळचे रुग्ण दारात उभे दिसायचे़ डॉक्टरांऐवजी दुसरा कुणी असता तर हे अमाप यश पाहून हुरळून गेला असता़ परंतु व्यवसायाला समाजऋण फेडण्याचे माध्यम समजणाऱ्या डॉक्टरांनी या रुग्णांप्रति असलेली बांधिलकी कधीही ढळू दिली नाही की त्यांच्यावर आलेली सामाजिक जबादारीही कधी नाकारली नाही़ रुग्णसेवेचे हे व्रत सांभाळतानाच सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यात कुठेच कमी पडले नाहीत़ तत्कालीन सरसंघचालकांपासून तर अगदी सामान्य व्यक्तीपर्यंत अनेक जण त्यांच्याकडून उपचार घेत़ परंतु त्यांच्यालेखी सर्व रुग्ण सदैव समानच राहिलेत व आहेत़ रुग्णांना ज्यांच्यात देवदूत दिसतो, असे हे डॉ. विलास डांगरे यांनी ४ नोव्हेंबर २०१४ रोजी वयाची ६० वर्षे पूर्ण करून ६१ व्या वर्षात पदार्पण केले आहे़ त्यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा ९ नोव्हेंबरला नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात संपन्न होत आहे. त्यांच्या हातून हे विधायक कार्य प्रदीर्घ काळ असेच घडत राहो, हीच सदिच्छा...
भ्रष्टाचार, स्वार्थी वृत्ती, बोकाळलेला वास्तुवाद आणि ढासळणारी जीवनमूल्ये अशा आजच्या वातावरणात एक अंधारमय निराशा सर्वत्र पसरत असताना, काही देदीप्यमान माणसे अशीही असतात जी परिणामाची पर्वा न करता आशेचा दीप घेऊन आपल्या ध्येयाच्या दिशेने अखंड चालत असतात़ डॉ़ विलास डांगरे हेही असेच सूर्यकुलाचा वारसा जपणारे व्यक्तिमत्त्व आहे़ एकिकडे वैद्यकीय क्षेत्राचे पूर्णत: व्यावसायिकीकरण झाले असताना व डॉक्टर मंडळी खोऱ्याने पैसे गोळा करीत असताना माझी ५० रुपये असलेली फी ५१ करणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करणारे डॉ़ डांगरे म्हणूनच वेगळे ठरतात़
डॉ़ विलास डांगरे यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा ९ नोव्हेंबरला डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे़ सरसंघचालक डॉ़ मोहन भागवत हे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राहणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत़ या सोहळयात अगत्यपूर्व उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे़

Web Title: In-patient doctor for patients with diarrhea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.