किमयाच म्हणा..! 37 दिवसांनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण शुद्धीवर, डॉक्टरांच्या पराकाष्ठेला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 12:52 PM2024-04-02T12:52:01+5:302024-04-02T12:54:02+5:30
Health News:
छत्रपती संभाजीनगर : तब्बल ३७ दिवस व्हेंटिलेटरवर राहिलेला १७ वर्षीय युवक घाटीतील डाॅक्टरांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेने अखेर शुद्धीवर आला. विशेष म्हणजे त्याला ‘टीबी’ असून, त्याच्या मेंदूच्या आवरणापर्यंत परिणाम झाल्याचे निदान डाॅक्टरांनी केले आणि त्यानुसार उपचार सुरू केले. त्यातूनच रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा सुरू झाली.
हा युवक वैजापूर तालुक्यातील रहिवासी आहे. त्याला झटके आणि ताप येत असल्याने कुटुंबीयांनी गंभीर अवस्थेत फेब्रुवारी २४ रोजी घाटीत दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. झटके येणे, ताप येण्यामागील कारणांचा डाॅक्टरांनी शोध घेतला. कुटुंबीयांकडे विचारपूस केली. तेव्हा ३ वर्षांपूर्वी एका रुग्णालयात युवकाच्या डोक्यातील द्रवाचे प्रेशर कमी करण्याचा उपचार केल्याचे सांगण्यात आले. या माहितीच्या आधारे रुग्णाच्या विविध तपासण्या केल्या असताना युवकाला ‘टीबी’ असल्याचे निदान झाले.
या ‘टीबी’चा परिणाम मेंदूच्या आवरणापर्यंत गेल्याने झटके येणे, ताप येणे असा त्रास होतो. ‘अँटी टीबी’ उपचार सुरू केल्यानंतर व्हेंटिलेटरवरील हा युवक ३७ दिवसांनंतर शुद्धीवर आला.
‘टीबी’मुळे दृष्टीवरही होतो परिणाम
‘टीबी’मुळे एका युवतीच्या दृष्टीवर परिणाम झाल्याचे गतवर्षी समोर आले होते. आता या युवकाच्या मेंदूपर्यंत ‘टीबी’ गेला. त्याला ‘टीबी’ आहे, हे त्याच्या कुटुंबीयांनाही माहीत नव्हते. त्याच्या घरातील एका सदस्याला ‘टीबी’ आहे.
- डाॅ. गजानन सुरवाडे,
सहयोगी प्राध्यापक, मेडिसीन विभाग