संपाचा फटका रुग्णांना! मुलाचा अपघात, मेंदूला गाठ अन् रुग्णालयात डॉक्टरच नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 10:07 AM2023-03-15T10:07:26+5:302023-03-15T10:07:41+5:30
पुण्याच्या ससून रुग्णालयात केवळ शहरातूनच नव्हे तर राज्याच्या विविध भागातून लोक उपचारासाठी येत असतात.
पुणे - जुनी पेन्शन सुरू करावी यासाठी मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या संपामुळे राज्यात अनेक ठिकाणी सर्वसामान्यांना फटका बसत आहे. त्यात सरकारी डॉक्टरांनीही संपात सहभाग घेतल्यामुळे रुग्णांचे हाल सुरू झाले आहेत. पुण्यात अपघातानंतर मुलाला हॉस्पिटलला आणले परंतु मुख्य डॉक्टरच संपावर गेलेत अशी परिस्थिती आलीय. आईनं ही व्यथा माध्यमांसमोर मांडली.
पुण्याच्या ससून रुग्णालयात केवळ शहरातूनच नव्हे तर राज्याच्या विविध भागातून लोक उपचारासाठी येत असतात. याठिकाणी डॉक्टरांच्या संपाचा दिवस सुरू झाल्याने रुग्णांचे हाल सुरू आहेत. यातच मुलाचा अपघात झाल्यानंतर त्याला उपचारासाठी कुटुंब ससून रुग्णालयात घेऊन आले. यावेळी मुलाच्या आईनं म्हटलं की, मुलाच्या मेंदूला गाठ आलीय. कालपासून डॉक्टर रुग्णालयात आले नाही. अपघातामुळे मेंदूला मार लागलाय. आपत्कालीन स्थिती आहे असं आईनं सांगितले.
तर सरकारने ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण कराव्यात आणि लवकरात लवकर हा संप मिटवावा. सध्या नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी लवकर यावे, रुग्णांवर उपचार करावे अशी मागणी कुटुंबाने केली आहे. त्यामुळे या परिस्थितीमुळे रुग्णांच्या कुटुंबावर ताण निर्माण झाला आहे. सरकारी रुग्णालयात मुख्य डॉक्टर येत नसल्याने आमच्या रुग्णाचे काय होणार अशी चिंता कुटुंबाला लागली आहे. त्यामुळे या परिस्थितीवर लवकर तोडगा काढण्याचं काम सरकारला करावं लागणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत बेमुदत संपाचा पवित्र घेतलाय. त्यानुसार, पहिल्या दिवशी राज्यातील सर्वच विभागात कर्मचाऱ्यांनी काम बंद करुन सरकारचे लक्ष्य वेधले. आज संपाचा दुसरा दिवस आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा करत कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मंगळवारी विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदनही केले.