शासकीय रूग्णालयातील अधिष्ठातांना करावी लागणार रुग्णसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:43 PM2019-10-15T12:43:39+5:302019-10-15T12:46:23+5:30
ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणार दिलासा; ओपीडी, आॅपरेशन थिएटरमध्येही जावे लागणार
सोलापूर : शासकीय रुग्णालयातील अधिष्ठाता यांनाही आता रुग्णांवर उपचार करावे लागणार आहेत. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने अधिष्ठातांना फक्त महाविद्यालयाची जबाबदारी सांभाळणे पुरेसे ठरणार नसून, त्यांना आॅपरेशन थिएटर, ओपीडीमध्येही रुग्णसेवा करावी लागणार आहे.
बहुतांश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता हे महाविद्यालयातील केबिनमध्ये बसून काम करतात. महाविद्यालय व विद्यार्थ्यांसंबंधी काम करत असतात. अधिष्ठाता यांना इतर डॉक्टरांच्या तुलनेने अनुभव जास्त असतो. त्यांच्या अनुभवाचा फायदा रुणांना व्हावा, तसेच नव्या डॉक्टरांना अधिष्ठाता यांच्याकडून शिकता यावे, याकरिता वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिष्ठाता कोणत्या वैद्यकीय क्षेत्रात तज्ज्ञ आहेत, त्यांना त्यासंबंंधी रुग्णसेवा द्यायची आहे.
वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या अतिरिक्त सहसंचालकपदी पुण्याच्या ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची निवड झाली आहे. त्यांनी अधिष्ठाता यांना रुग्णसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुुळे राज्यात असणाºया १९ वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांना आता महाविद्यालयाच्या जबाबदाºया सांभाळत रुग्णसेवा करावी लागणार आहे.
अधिष्ठाता यांनी रुग्णसेवा केली तर त्यांना रुग्ण व रुग्णसेवेसंबंधी दिल्या जाणाºया सेवांविषयी अधिक चांगल्या प्रकारे माहिती होणार आहे. रुग्ण, डॉक्टर व कर्मचारी यांना येणाºया समस्या अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना समजू शकणार आहेत. यामुळे रुग्णसेवा तर दर्जेदार होईलच सोबत रुग्ण, डॉक्टर व कर्मचारी यांच्या समस्या सोडवणे देखील सोयीचे होणार आहे. जे अधिष्ठाता न्यायवैद्यक, शल्यविशारद, फिजिशियन तज्ज्ञ आहेत त्यांच्यासाठी या आदेशाचे पालन करणे महत्त्वाचे असणार आहे.
रुग्णांशी थेट संवाद साधता येणार- ठाकूर
- अधिष्ठाता यांना रुग्णसेवा देण्याबाबतच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. अधिष्ठाता यांचे पहिले काम हे रुग्णसेवा हेच असायला हवे. त्यामुळे हा निर्णय अगदी योग्य आहे. मी विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच रुग्णसेवाही करत असतो. यामुळे गरजूंना दर्जेदार वैद्यकीय सेवा तर मिळेलच, सोबत रुग्णांशी थेट संवाद साधता येणार असल्याचे शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले.