मार्ड संपामुळे मुंबईत रुग्णांचे हाल

By admin | Published: July 3, 2015 03:29 AM2015-07-03T03:29:37+5:302015-07-03T03:29:37+5:30

‘डॉक्टर आलेत का, आज तपासणीचा वार होता.’ ‘आता त्रास होतोय का?, मग आज तपासणी होणार नाही.’ नंतर या.... मात्र ज्यांना त्रास होत असेल, त्यांच्याशी होणारा संवाद थोडा

Patients in Mumbai due to Morning Stamp | मार्ड संपामुळे मुंबईत रुग्णांचे हाल

मार्ड संपामुळे मुंबईत रुग्णांचे हाल

Next

मुंबई : ‘डॉक्टर आलेत का, आज तपासणीचा वार होता.’ ‘आता त्रास होतोय का?, मग आज तपासणी होणार नाही.’ नंतर या.... मात्र ज्यांना त्रास होत असेल, त्यांच्याशी होणारा संवाद थोडा वेगळा होता. ‘तुम्हाला त्रास होतोय ना? चला, तिथे आत जा.’ असे सांगत विविध सरकारी, महापालिका रुग्णालयांमधील सीनियर डॉक्टर ‘मैदानात’ उतरल्याचे मार्ड संपावेळी दिसून आले.
मार्डने त्यांच्या १० प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील ४ हजार निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या मास बंकमुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. पण, सीनियर डॉक्टर्सच्या उपस्थितीने अधिक हाल होणे टळले. वरिष्ठ डॉक्टर अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करताना दिसत होते. या डॉक्टरर्सनी बाह्यरुग्ण विभागाच्या बरोबरीनेच शस्त्रक्रियादेखील केल्या. निवासी डॉक्टरांच्या मास बंकचा पहिला दिवस असल्याने फार अडचण आली नाही. पण, उद्याही निवासी डॉक्टर संप सुरू असल्यास काय परिस्थिती उद्भवेल हे सांगणे कठीण असल्याचे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.
केईएम रुग्णालयातील सकाळपासून दुपारपर्यंत गर्भवती महिलांची गर्दी जमली होती. अनेकांना मार्डचा संप असल्याचे माहीत नव्हते. यामुळे अनेक गर्भवती महिला ठरल्याप्रमाणे तपासणीसाठी आल्या होत्या. पण, निवासी डॉक्टर कामावर नसल्याने ज्या महिलांना आठवा, नववा महिना चालू आहे, ज्या महिलांना त्रास होत आहे, अशा महिलांची तपासणी करण्यात आली.
इतर गर्भवती महिला तास दीड तास ताटकळत बसून होत्या. एलफिन्स्टन रोड स्थानकाजवळ एक मुलगा मोबाइलवर बोलताना खाली पडला. त्याच्या चेहऱ्याला, हाताला जखमा झाल्या. उपचारासाठी त्याला केईएम रुग्णालयात आणले. आपत्कालीन विभागात त्याच्यावर प्राथमिक उपचार झाले. पण, उर्वरित उपचारांसाठी त्याला अर्धा ते एक तास थांबावे लागले. लवकर उपचार न मिळाल्याने या तरुणाच्या नातेवाइकांची अस्वस्थता वाढली होती.
सायन रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसून आली. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांना उपचारासाठी सुमारे तासभर थांबावे लागत होते. तरीही शक्य तितक्या जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली. काही शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. नायर रुग्णालयातही अशीच काहीशी परिस्थिती दिसून आली. कूपर रुग्णालयातही रुग्णसेवेवर फारसा परिणाम दिसून आला नाही.

रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याची दक्षता
१या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रभारी मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीना यांनी गुरुवारी मंत्रालयात बैठक घेऊन या काळात रुग्णसेवा विस्कळीत होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याविषयी सूचना दिल्या. मुख्य सचिवांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) संवाद साधला. मुख्य सचिव म्हणाले, राज्यातील १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि ४ महापालिका वैद्यकीय महाविद्यालांमधील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
२अकोला, धुळे, कोल्हापूर येथील सर्व डॉक्टरांनी कामबंद केले असून पुणे येथील ५० टक्केच डॉक्टर सहभागी झाले आहेत. या आंदोलनाचा रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून ज्या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये आहेत अशा औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, धुळे, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, अकोला, यवतमाळ, नागपूर येथील जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांशी मीना यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
३सुटीवर असलेल्या शासकीय डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून रुग्णालयातील अपघात विभाग २४ तास कार्यरत राहावा, तसेच अत्यावश्यक शस्त्रक्रिया, बाह्यरुग्ण विभाग सुरळीत सुरू राहील अशा पद्धतीने डॉक्टरांच्या ड्युटी लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या सेवा वरिष्ठ डॉक्टरांना सहायक म्हणून देण्याबाबतचा निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला.

सायन रुग्णालयात रुग्णांना प्रतिसाद
मुंबईसह राज्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी सायन रुग्णालयात येतात. ही बाब लक्षात घेऊन आज येथील निवासी डॉक्टर वगळता अन्य डॉक्टरांनी रुग्णांवर योग्य उपचार केले.
निवासी डॉक्टरांनीदेखील रुग्णांना जास्त त्रास होणार नाही, याची दखल घेतल्याचे दिसून आले. सकाळी ८पूर्वी निवासी डॉक्टरांनी त्यांच्या हातात असलेली सर्व कामे योग्यरीत्या पार पाडली. त्यामुळे अन्य डॉक्टरांवर त्याचा अधिक ताण पडला नाही.
सायन रुग्णालयात दररोज अनेक शस्त्रक्रिया होतात. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे कालपर्यंत निश्चित झालेल्या सर्व शस्त्रक्रिया रुग्णालयात पार पडल्या.
सायन रुग्णालयात एकूण ६४९ निवासी डॉक्टर आहेत. रुग्णांना त्रास होऊ नये, यासाठी त्यातील ९३ डॉक्टर कामावर हजर होते. ओपीडीदेखील नेहमीप्रमाणे सुरू होती.

शताब्दीत संपच नाही!
चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्द परिसरातील रहिवाशांसाठी या परिसरात पालिकेचे शताब्दी हे एकमेव रुग्णालय आहे. या ठिकाणीदेखील दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र आज येथील एकाही डॉक्टराने संपामध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे या रुग्णालयात नेहमीप्रमाणे सर्व रुग्णसेवा सुरळीत होत्या.

सरकारशी आम्ही सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक बैठकांमध्ये झालेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून दोनदा मासबंक रद्ददेखील केला. रुग्णसेवा धोक्यात येऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली. तरीही सरकार मार्डला गृहीत धरून आमच्या गंभीर प्रश्नांबाबत कोणतीच स्पष्ट भूमिका घेत नाही. यामुळे आता लेखी स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोवर मासबंक सुरुच ठेवणार आहोत. - मध्यवर्ती मार्डचे उपाध्यक्ष डॉ. अमित लोमटे

Web Title: Patients in Mumbai due to Morning Stamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.