शाळांच्या दुकानदारीमुळे पालकवर्ग त्रस्त
By admin | Published: June 9, 2017 02:33 AM2017-06-09T02:33:46+5:302017-06-09T02:33:46+5:30
पनवेल परिसरातील शाळांकडून ठरावीक दुकानातूनच गणवेश अथवा शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे.
अरुणकुमार मेहत्रे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : पनवेल परिसरातील शाळांकडून ठरावीक दुकानातूनच गणवेश अथवा शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. मात्र ही सक्ती पालकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. प्रवेश अर्जासोबतच कोणत्या दुकानातून गणवेशासह शालेय साहित्य घ्यावे, याची माहिती दिली जाते. काही शाळांनी तर दुकानांशी थेट टायअप केल्याचे दिसून येत आहे.
काही बड्या शाळांमध्ये तर शालेय साहित्याची दुकाने मांडून त्याद्वारे अवास्तव किमतीत पुस्तके, गणवेश आणि स्टेशनरीची विक्र ी केली जात आहे. शाळांकडून आर्थिक पिळवणूक सुरू असून यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, खारघर त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात अनेक खासगी शिक्षण संस्था आहेत. या शाळांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते. नर्सरीकरिता एका शाळेत ४२ हजारांचे शुल्क यंदा घेण्यात आले. सेंट जोसेफ त्याचबरोबर इतर शाळांमध्ये फी वाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यातच शाळा व्यवस्थापनाकडून कमिशनच्या मोहापायी काही मोजक्याच दुकानदारांकडून शालेय साहित्य, पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्यासाठी सक्ती केली आहे.
माध्यमिक शाळांनी गणवेश, इतर शैक्षणिक साहित्याची सक्ती करू नये, असा अध्यादेश मे २०१७ रोजी शिक्षण उपसंचालकांकडून काढण्यात आला. मात्र त्याला चक्क केराची टोपली दाखवत बहुतांश शाळांची मनमानी सुरूच ठेवली आहे. शाळांकडून सुचविण्यात येणाऱ्या ठरावीक दुकानांसह शाळेतील स्टॉल्समधून पालकांना शालेय साहित्याचा सेट करून तो मनमानी किमतीला विक्र ी केला जात आहे. ज्या वस्तूंची विद्यार्थ्यांना वर्षभर गरजही भासणार नाही, अशा वस्तूंची भरही या सेटमध्ये घातली जात आहे.
>नियम केवळ कागदावरच
शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश अथवा अन्य शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा शाळा वा व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या विशिष्ट दुकानातूनच खरेदीची सक्ती विद्यार्थी किंवा पालकांना करता येणार नाही हा नियम आहे, मात्र तो फक्त कागदावरच असल्याने पालकवर्ग त्रस्त आहे.