पटोलेंचा भाजपाला ‘रामराम’, गुजरातमध्ये भाजपाविरोधात प्रचार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:52 AM2017-12-09T05:52:37+5:302017-12-09T05:54:05+5:30
गुजरात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच भाजपाचे बंडखोर नेते नाना पटोले यांनी शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेटही घेतली.
नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच भाजपाचे बंडखोर नेते नाना पटोले यांनी शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेटही घेतली. नाना पटोले गुजरातमध्ये भाजपाविरोधी प्रचार करायला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पटोले गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत होते. त्यांनी शुक्रवारी दुपारी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे राजीनामा सादर केला. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी शेतकºयांचे प्रश्न सोडवण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरल्याची तोफ डागली.
राजीव सातव यांची मध्यस्थी
पटोले यांनी नोव्हेंबरमध्ये राहुल गांधी तसेच अहमद पटेल यांची भेट घेतल्याची चर्चा होती. राजीनामा सादर करण्यापूर्वी पटोले यांनी काँग्रेसचे खा. राजीव सातव यांची भेट घेतली. सातव राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करून ते विजयी झाले होते. विदर्भात ते ओबीसींचे मोठे नेते मानले जातात. पटोले यांच्या राजीनाम्यामुळे विदर्भात भाजपाला धक्का बसण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदींची भूमिका लोकशाहीला शोभणारी नाही
ही खुर्ची माझी नसून, लोकांची आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी आलो होतो. मात्र, इथे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. पंतप्रधानांची भूमिका लोकशाहीला शोभणारी नाही, त्यामुळे आता लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी लढू. जीएसटी, नोटाबंदीनंतर युवकांच्या नोकºया गेल्या. बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारकडून पावले उचलली गेली नाहीत. मोदींविषयी अनेक मंत्री, खासदारांमध्ये खदखद आहे. त्यातील अनेक जण राजीनामा देतील. - नाना पटोले
काँग्रेस हे पटोलेंचे घरच
काँगे्रस हे नाना पटोलेंचे घरच आहे. त्यांचे घरात कधीही स्वागत आहे. मी त्यांचे अभिनंदन करायला आलो आहे. - मोहन प्रकाश, काँग्रेस प्रभारी, महाराष्ट्र
ओबीसी नेता गमावला
हिवाळी अधिवेशनात इतर मागासवर्गीय आयोगास घटनात्मक दर्जा देणारे विधेयक येणार असताना ओबीसी खासदाराने राजीनामा दिल्याने भाजपामध्ये अस्वस्थता आहे. ओबीसी नेत्यांना मिळणारी वागणूक, शेतकरी समस्या, बेरोजगारी, भाजपाध्यक्ष अमित शहा व मोदी यांची कार्यशैली यावर पटोले गुजरातमध्ये प्रचार करू शकतात.
गेल्या वर्षी खासदाराच्या बैठकीत पंतप्रधानांसमोर शेतकºयांचे प्रश्न उपस्थित केल्याने पटोलेंची खरडपट्टी काढण्यात आली होती. तेव्हापासून ते नाराज होते..