पोतराज प्रथेला मूठमाती!
By admin | Published: April 17, 2015 01:31 AM2015-04-17T01:31:09+5:302015-04-17T01:31:09+5:30
परंपरा आणि कुटुंबाच्या हट्टामुळे १६ वर्षीय युवकाचा ‘पोतराज’ बनविण्याचा विधी झाला. पण समाजात मिळणाऱ्या हीन वागणुकीमुळे तो अस्वस्थ झाला अन् या परंपरेच्या जोखडातून मुक्त होण्याचा निर्धार त्याने केला़
महेश कोटीवाले - सोलापूर
परंपरा आणि कुटुंबाच्या हट्टामुळे १६ वर्षीय युवकाचा ‘पोतराज’ बनविण्याचा विधी झाला. पण समाजात मिळणाऱ्या हीन वागणुकीमुळे तो अस्वस्थ झाला अन् या परंपरेच्या जोखडातून मुक्त होण्याचा निर्धार त्याने केला़ त्याची ही व्यथा काही सामाजिक कार्यकर्त्यांना कळली़ त्यांनी त्याच्या कुटुंबीयांना मार्गदर्शन केले आणि त्याचा मार्ग सुकर झाला़ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाचा मुहूर्त साधून तब्बल १८ वर्षांनंतर त्याने जटा निर्मूलन करीत दीपक अंकुश दावणे या युवकाने पोतराज परंपरेला मूठमाती दिली.
दहावीला ६७ टक्के एवढे गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता़ वयाच्या १६व्या वर्षी झालेल्या पोतराज विधीमुळे शिक्षणाचा काहीच उपयोग होणार नाही आणि आपल्याला समाजात ‘पोतराज’ म्हणून वावरावे लागणार असल्याच्या विचाराने दीपक अस्वस्थ झाला. ही व्यथा काही सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली़ आरपीआय मोहोळ तालुका उपाध्यक्ष पांडुरंग दावणे, बहुजन शिक्षक-शिक्षकेतर (प्राथमिक विभाग) संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे, अनिल चंदनशिवे आदींनी दीपकच्या कुटुंबाचे मतपरिवर्तन केले. डॉ़ आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे मुहूर्त साधून आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते दीपकचे जटा निर्मूलन करण्यात आले़ १८ वर्षे १४ दिवस केसाचे संगोपन केले, आज मी अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त झालो, अशी भावना दीपकने व्यक्त केली़
हीन वागणुकीमुळे निर्णय
दीपकचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू आहे. अभ्यासात हुशार. सर्व प्रकारची वाहनेही त्याला चालविता येतात़ दीपकने सामाजिक कार्यात सहभाग घेत आंदोलनही केले़; मात्र पोलिसांनी त्याला हीन प्रकारची वागणूक दिली होती़ या वागणुकीने व्यथित होऊन या प्रथेतून बाहेर पडायचेच, असा निर्धार दीपकने केला आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तो पूर्णही केला़
विधीसाठी काढले ऋण
२०१३ मध्ये १६ व्या वर्षी दीपकचा पट बसविण्याचा (पोतराज बनविण्याचा) विधी करण्यात आला. कुटुंबाला या विधीसाठी ४० हजार रुपये खर्च करावे लागले तेही ऋण काढूऩ