घरात ‘नागपंचमी’ गावात ‘पत्तेपंचमी’
By Admin | Published: August 6, 2016 04:54 PM2016-08-06T16:54:05+5:302016-08-06T16:55:03+5:30
नागपंचमी या सणाची ग्रामीण भागात मोठी आतुरता असते. या दिवशी बहुतांश गावात पत्ते खेळण्याची परंपरा आहे.
>धनंजय कपाले
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ६ - नागपंचमी या सणाची ग्रामीण भागात मोठी आतुरता असते. या दिवशी बहुतांश गावात पत्ते खेळण्याची परंपरा असुन यात तरूणांसह वृध्दांचाही समावेश असतो. मात्र, या परंपरेला वेगळे वळण लागत असून नागपंचमीचा सण संपल्यानंतरही अनेक गावांत पत्त्याचे डाव रंगतात.
पवित्र श्रावणाचा महिना म्हणजे सणांची मांदियाळीच, नागपूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपंचमी या सणाला अनन्य साधारण महत्त्व असले तरी काही कुप्रथाही अनेक वर्षांपासून रूढ झाल्या आहेत. आषाढ महिन्यातील दीप अमावस्येला ‘गटारी अमावस्या’ साजरी केल्यानंतर गावागावातील जुगारी नागपंचमीच्या दिवशी ‘पत्ते पंचमी’ साजरी करीत दिवस-रात्र पत्त्यांच्या डावात लाखो रुपयांची उलाढाल करून कुणी कंगाल तर कुणी मालामाल होतात.
जुगा-यांना पर्वणी ठरलेल्या पत्ते पंचमीला वाशिम शहरासह प्रत्येक तालुक्यात गावात पत्त्यांचे मोठे डाव भरविले जातात. जिल्ह्यातील अनेक गावामध्ये तर या डावाला अक्षरश: जत्रेचे स्वरूप येते. यात एक्का-बादशाह, तिर्रट असे पत्त्यांचे खेळामध्ये पैसे लावून हजारो रुपयांचा जुगार खेळला जातो.
ग्रामीण भागात दिवस उगवल्यापासूनच सर्रासपणे कोणाचीही भीती न बाळगता पत्त्यांचे डाव सुरू होते. शहरासह ग्रामीण भागात या दिवशी खेळल्या जाणाºया जुगाराकडे पोलिसांचाही काना डोळा असतो. नागपंचमीच्या दिवशी सुरू असलेल्या या पत्ते पंचमीच्या खेळात जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. दिवस आणि रात्रभर खेळल्या जाणाºया या पत्त्यांच्या खेळात लाखो रुपयांची उलाढाल होते.
गेल्या अनेक पिढ्यांपासुन घरात ‘नागपंचमी’ तर गावात सार्वजनिक ‘पत्तेपंचमी’ साजरी होताना दिसून येत आहे. पत्त्यांच्या या खेळांमुळे तरुणपिढी व्यसनाधीन होऊन नादी लागत आहे. जुगाराच्या या खेळात अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ही प्रथा बंद करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
गत दोन ते तीन वर्षाआधी पोलीस विभागाच्यावतिने या दिवशी विशेष मोहीम राबविण्यात आली होती.