मान्सूनचा पॅटर्न बदलतोय; त्यासाठी तयार रहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 06:01 AM2019-08-12T06:01:51+5:302019-08-12T06:02:15+5:30

मान्सूनचा पॅटर्न बदलतोय, असे मत मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफी टेबल’ या मुलाखत सदरातंर्गत मांडले.

The pattern of the monsoon is changing; Get ready for it! | मान्सूनचा पॅटर्न बदलतोय; त्यासाठी तयार रहा!

मान्सूनचा पॅटर्न बदलतोय; त्यासाठी तयार रहा!

googlenewsNext

एखाद्या परिसरात कमी काळात प्रचंड पाऊस, अवेळी गारपीट, उष्णतेच्या लाटा हे सारे हवामानातील बदलांचे परिणाम आहेत. मान्सूनचा पॅटर्न बदलतोय. तो सरासरी पूर्ण करतोय, पण शेतीसाठी त्याचा उपयोग होताना दिसत नाही. एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे पूर अशी स्थिती पाहायला मिळते. जोवर तापमान नियंत्रणात यश येणार नाही, तोवर भविष्यात हवामान आणखी बदलेल. ते गृहीत धरून त्यासाठी आपण तयार राहायला हवे, असे मत मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफी टेबल’ या मुलाखत सदरातंर्गत मांडले.

कोकण, दक्षिण महाराष्ट्रात पूरस्थिती असताना मराठवाड्यात मान्सूनचे प्रमाण कमी का आहे?
मराठवाड्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. अरबी समुद्र-पश्चिम घाटामुळे कोकण, पश्चिम-दक्षिण-मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडतो. पण त्यापुढे तो तेवढा पडत नाही. विदर्भाच्या काही भागांना बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीचा फायदा होतो. हल्ली पाऊस पडला नाही, की लगेच ‘ला निनो’ आणि ‘अल निनो’ या दोन्ही प्रशांत महासागरातील घटकांचा उल्लेख केला जातो. ते मान्सूनवर परिणाम करतात. पण केवळ त्यांचाच परिणाम होतो असे नाही. जागतिक तापमानवाढ, कार्बनचे वाढत गेलेले उत्सर्जन यांचाही परिणाम होतो.

मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे?
मूळ मान्सून ही सक्षम प्रणाली आहे. मान्सूनचे फक्त त्याचे वितरण बदलत असते. सलगपणे पाऊस पडण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. जगाचे तापमान दीड अंशांनी कमी करण्याचा संकल्प सर्व देशांनी सोडला आहे, पण जोवर ते प्रत्यक्षात येत नाही, तोवर मान्सूनचा पॅटर्न बदलत जाणार. शेतीला जसा नियमित पाऊस लागतो, तसा पडेल हे खात्रीने सांगता येणार नाही. कमी काळात प्रचंड पाऊस, अवेळी पाऊस-गारपीट, उष्णतेच्या वाढणाऱ्या लाटा- त्यांची वाढलेली तीव्रता- त्या लाटा अधिक काळ टिकून राहणे, थंडीचे प्रमाण वाढणे, आंब्याला लवकर मोहोर येणे असे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. सुरूवातीच्या काळात देशात मान्सूनची ३५ टक्के तूट होती. आजघडीला ती दोन टक्क्यांवर आली आहे. मुंबईत पावसाने केव्हाच सरासरी गाठली आहे. मुंबईत दोन हजार ४०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पूर्वी एकाचवेळी २५० ते ३०० मिलीमीटर पावसाचे दिवस कमी असायचे, हल्ली ते नियमितपणे पाहायला मिळतात, ते यामुळेच.

दुष्काळी परिस्थिती अशीच राहणार का? त्यावर उपाय काय?
भौगोलिक परिस्थितीमुळे मराठवाड्यात कमी पाऊस पडतो. त्यामुळे त्या भागात वाहून जाणारे पाणी अडवणे हाच उपाय आहे. जलयुक्त शिवारसारख्या योजना, पाणी जमिनीत मुरवणे असे उपाय केले पाहिजेत. ज्या पिकांना भरपूर पाणी लागते, त्यांच्यासाठी एकतर सुक्ष्म सिंचन किंवा ठिबक सिंचनाचा वापर करणे किंवा कमी पाण्यात होणाºया पिकांची लागवड करणे असे उपाय योजले पाहिजेत. त्याच्याशी संबंधित वेगवेगळे विभाग त्यावर काम करत आहेत.

सध्या मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू आहे. तो कसा पार पाडतात?
जेथे कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे; तेथील ढगांची क्षमता तपासावी लागते. ढगांतील बाष्पाचे प्रमाण, त्यांची उंची, वाºयाची दिशा, जमिनीपासून ढगांचे अंतर असे वेगवेगळे घटक तपासले जातात. रडारपासून वापरल्या जाणाºया विमानापर्यंत शास्त्रीय आधार
घेतला जातो. मेघ बीजारोपणासाठी कोणते रसायन वापरायचे हे ठरविले जाते. त्यानंतर क्षमता असलेल्या
ढगात रसायनांचे सुक्ष्म कण फवारले जातात आणि मग पुढील प्रक्रिया होते. त्यानंतर १५ मिनिटे ते तासाभरात पाऊस पडण्याची शक्यता असते. हे तंत्रज्ञान गेली ५० ते ६० वर्षे वापरले जात आहेत. त्यात भरपूर सुधारणा झाल्या आहेत. केवळ पाऊस पाडण्यासाठी नव्हे, तर गारपीटीच्या काळातही त्याचा वापर करता येऊ शकतो. गारा पडून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी याच पद्दतीने ढगांवर फवारणी करून त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते.

हवामानाचे अंदाज अधिक अचून होण्यासाठी कोणते प्रयोग सुरू आहेत?
हवामानाचा अंदाज जितक्या कमी कालावधीचा, तेवढे अंदाज अचूक ठरतात. त्यातही विमान वाहतूक, समुद्रात जाणारे मच्छीमार-जहाजे, शेतकरी या प्रत्येकाच्या गरजा लक्षात घेऊन वेगवेगळ््या पद्धतीने हवामानाचे अंदाज दिले जातात. ते अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणाºया मराठवाड्यात विज्ञानाशी जोडले गेलेले कार्यक्रम राबविले पाहिजेत. कर्नाटकात असे प्रयोग राबविले जात आहेत. भविष्यात हवामान आणखी बदलणार आहे. त्याच्या परिणामांसाठी आपण तयार रहायला हवे.

पावसाची आतापर्यंतची स्थिती कशी आहे?
देशात सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रात (सरासरीच्या ३२ टक्के) नोंदविण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद पुण्यात १३८ टक्के झाली आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक, तर मराठवाड्यातील सात जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. जून महिन्यात हळुवार बरसणाºया पावसाने जुलै आणि आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपली कसर भरून काढली. विशेषत: आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. आठ दिवसांत नद्या, धरणे भरली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. परिणामी पूरस्थिती निर्माण झाली.

(शब्दांकन - सचिन लुंगसे)
 

Web Title: The pattern of the monsoon is changing; Get ready for it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.