वेगळ्या विदर्भाच्या मुद्याला तूर्तास विराम द्या - मुख्यमंत्र्यांनी ठणकावले
By admin | Published: August 2, 2016 12:31 PM2016-08-02T12:31:17+5:302016-08-02T12:31:36+5:30
भाजपाने छोट्या राज्यांची आपली भूमिका कधीच लपवली नाही, मात्र तूर्तास सरकारसमोर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या कोणताही प्रस्ताव मांडण्यात आलेला नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - भारतीय जनता पक्षाने छोट्या राज्यांची आपली भूमिका कधीच लपवलेली नाही, मात्र तूर्तास सरकारसमोर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या कोणताही प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही. त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या मुद्याला तूर्तास विराम द्या, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळात स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा चांगलाच गाजत असून आजही या मुद्यावरून सभागृहात गदारोळ माजला. शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांनी आज अखंड महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या तर शिवसेनेने विधानभवनाच्या पाय-यांवरही आंदोलन केले. तसेच या मुद्यावर मुख्यमंत्री व भाजपाने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही केली. त्यावर आज मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.
मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव आलेलाच नाही. तो निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही, तर केंद्राचा असतो. भाजपाने छोट्या राज्यांची भूमिका कधीही लपवलेली नाही, तसेच शिवसेनेनेही अखंड महाराष्ट्राची भूमिका कधीच सोडलेली नाही. मात्र सत्तेत आम्ही युतीचे सरकार म्हणून एकत्र असलो, तरी तरी वेगळ्या विदर्भाचा प्रस्तावाच नसल्यामुळे, ही चर्चा इथेच थांबवावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
भाजपची छोट्या राज्यांची भूमिका असली, तरी मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेय तसेच माझा राजीनामा मागण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंत पाटलांना नाही, असंही ते म्हणाले. आम्ही तुमच्या मेहेरबानीवर निवडून आलेलो नाही, आम्हाला जनतेने निवडून दिलं आहे. त्यामुळे आमचा राजीनामा मागण्याचा हक्क जनतेला आहे, तुम्हाला नाही, असा शब्दांत त्यांनी विरोधकांना ठणकावले.