पौष महिना ‘संडे टू संडे’ यात्रेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2016 05:19 PM2016-12-27T17:19:23+5:302016-12-27T17:19:23+5:30
सावखेडा बुद्रुक येथील भैरवनाथाची यात्रा आहे. या यात्रेचे वैशिष्टय म्हणजे ही यात्रा दरवर्षी पौष महिन्यात ‘संडे टू संडे’ भरते.
ऑनलाइन लोकमत
वरखेडी ता. पाचोरा, दि. 27 - जळगाव जिल्ह्यातील प्रसिध्द यात्रोत्सवांपैकी वरखेडी गावाच्या दक्षिणेस २ कि.मि.अंतरावरील सावखेडा बुद्रुक येथील भैरवनाथाची यात्रा आहे. या यात्रेचे वैशिष्टय म्हणजे ही यात्रा दरवर्षी पौष महिन्यात ‘संडे टू संडे’ भरते.
या ठिकाणी असलेले भैरवनाथ देवस्थान हे जागृत-जाज्वल्य मानले जाते ते परिसरातील भाविकांचे लोकदैवत आहे. बोली भाषेनुसार नवसाला पावणारा भैरोबा म्हणूनही या दैवाताची ओळख आहे. बहुळा, उतावळी व खडकाळ नदीच्या त्रिवेणी संगमावर निसर्ग रम्य वातावरणात सावखेडा बुद्रुक गावाजवळ भैरवनाथांचे दिमाखदार मंदिर भाविकांना आकर्षित करते जवळ-जवळ ४०० वर्षांची परंपरा असलेल्या सावखेडा बुद्रुक येथील जागृत देवस्थान भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव १ जानेवारी पासून सुरु होत आहे. ८, १५ व २२ जानेवारी २०१७ असे चार रविवार यात्रोत्सव साजरा होणार आहे. सोमवारी २३ जानेवारी रोजी सायंकाळी देवस्थानापासून पंचक्रोशीतील सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द, वरखेडी बु, भोकरी, वरखेडी खुर्द व लासुरे या गावांतून पालखी मिरवणूक निघेल. २४ जानेवारी रोजी सकाळी-सकाळी पालखी देवस्थानाजवळ विश्रामस्थ होऊन यात्रोत्सावाची सांगता होईल. त्या अनुषंगाने भैरवनाथ संस्थानतर्फे जोरदार तयारी करण्यात आली आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यात भैरवनाथांचे तीन वाण असून शिवाचा अवतार असलेले सत्व,रज,तम असे ते आहेत. या ठिकाणी मंदिरात पूर्वीचे पुजारी बंगाली बाबा, पंढरी बाबा व सूरदास बाबा यांच्या समाधी आहेत. मंदिराच्या बाहेरच फिरणारा गोटा आहे श्रद्धाळू या गोट्यावर हात ठेवून आपल्या मनातील हेतू व्यक्त करतात. गोटा योग्य दिशेने फिरल्यास मनोवांच्छित हेतू सफल होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच येथे पिशाच्च बाधा घालवण्यासाठी बरेच बाधीत लोक आलेले असतात. अनेक जण घुमताततही. आणि हे दृश्य इतर भाविक कुतुहलाने बघत असतात.येथे सर्व बाधा नष्ट होतात अशी देखील श्रद्धा आहे. रामचंद्र बाबा भैरवनाथ महाराजांचे पुजारी आहेत. तेच या सर्व बाधितांवर भैरवनाथांच्या कृपेत सेवा करीत असतात.
दरवर्षी पौष महिन्यातील प्रत्येक रविवारला येथे यात्रोत्सव साजरा होत असतो. हा यात्रोत्सव सर्वांसाठी पर्वणीच असते.
यात्रोत्सवाची तयारी शनिवार पासूनच केली जाते. विविध दुकाने थाटली जातात. संस्थान तर्फे कीर्तन,भजन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.या यात्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे आजच्या आधुनिक युगात देखील श्रद्धाळू भाविक परिवारासह बैलगाडीने यात्रेसाठी येतात. यात्रोत्सव काळात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजुळ आवाज परिसरात घुमत असतो व एक नवीन चैतन्य वातावरणात निर्माण होते.
भाविकांची अगाध श्रध्दा असलेल्या या दैवतासमोर मानलेल्या इच्छीत फलप्राप्तीनंतर कबुल केलेल्या नवसाची फेड सहसा पौष महिन्यातील यात्रोत्सवात आवर्जून केली जाते. वरण-भात-बट्टी हा येथील नवसाचा स्वयंपाक असून, मंदिर परिसातच भोजन तयार झाल्यावर भैरवनाथाना प्रथम नैवद्य दाखवून मग मित्र मंडळी,व आप्तेष्टांसह भोजनाचा आस्वाद घेतला जातो. तसेच कुणी नवसात नारळाचे तोरण, तर कुणी भारोभार गुळाचा नवस कबुल करतात. या यात्रोत्सव काळात हजारो भाविक भैरवनाथ महाराजांचे दर्शनाचा लाभ घेतात. सकाळी ४ वाजता महाआरती केली जाते. मग दिवसभर दर्शनार्थींची लांबच लांब रांग असते. भैरवनाथांच्या दर्शनाने भाविक प्रसन्न होऊन जातात. एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो.
यात्रोत्सवात सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल, पान टपरी, िवविध खेळणी, संसारोपयोगी वस्तू, किराणा दुकान, बेल-फुल, नारळाचे दुकान, पाळणे, मौत का कुवा, कोल्ड्रिंक्स, भेल-भत्ता, कटलरी, सौंदर्य प्रसाधने अशा सर्व प्रकारच्या व्यावसायिकांसाठी हा यात्रोत्सव आमदनी देणारा ठरत असतो.
यात्रोत्सव काळात पाचोरा,जामनेर,चाळीसगाव,जळगाव बस आगारातर्फे जादा बस सोडण्यात येतात.याकाळात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून पिंपळगाव (हरे.)पोलिसांकडून स.पो.नि.संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला आहे. जळगाव, जामनेर, पहूर, चाळीसगाव,पाचोरा व जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन चे अतिरिक्त पोलीस कर्मचारी देखील येथे बंदोबस्तासाठी बोलविले जातात. विशेष म्हणजे हिंदू भाविकांसह मुस्लीमही दर्शनासाठी हजेरी लावत असल्याने येथे एकात्मतेचे दर्शन घडते.