पाचगाव देशातील पहिले वायफाय खेडे
By Admin | Published: July 6, 2015 02:15 AM2015-07-06T02:15:28+5:302015-07-06T02:15:28+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या घोषणेनंतर उमरेड तालुक्यातील पाचगाव येथे मोफत ‘वायफाय’ सुरू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली.
उमरेड (जि़ नागपूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या घोषणेनंतर उमरेड तालुक्यातील पाचगाव येथे मोफत ‘वायफाय’ सुरू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली. त्यानुसार पाचगाव हे देशातील पहिले ‘वायफाय’ गाव ठरले आहे. संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत २५ कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजनही या वेळी करण्यात आले़
या वेळी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, खासदार कृपाल तुमाने आदी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात १०० टक्के ग्रामपंचायती वायफाय यंत्रणेशी जोडण्यात येणार असून, देशभरातील अन्य राज्यांत ४० टक्के ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा पुरविण्यात येणार आहे. सदर महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम युद्धस्तरावर सुरू झाले असून, डिसेंबर २०१५पर्यंत या टेक्नॉलॉजीचा लाभ नागरिकांना मिळणार असल्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. संसद आदर्श ग्राम या योजनेंतर्गत ‘विकास आराखडा’ही तयार करण्यात आला असून, केंद्र शासनाकडे सदर प्रस्ताव पाठविल्याचे ते म्हणाले़
बेरोजगारीच्या विळख्यातून मुक्त झालेला युवावर्ग, व्यसनमुक्त समाज, कर्जमुक्त शेतकरी असे स्वप्न मी या गावाचे बघत आहे. जोपर्यंत आपण आदर्श होणार नाही, तोपर्यंत गावही आदर्शाच्या पंक्तीत बसणार नाही. माझेही गाव असेच झाले पाहिजे, असे अन्य गावांसमोर आदर्शव्रत हे गाव उभारायचे आहे. या गावाचा सर्वांगीण विकास करण्यास मी कटिबद्ध असल्याचे वचनही या वेळी गडकरी यांनी दिले. कार्यक्रमात तावडे, लोणीकर आदी मान्यवरांचीही भाषणे झाली़ (प्रतिनिधी)
> गडकरी म्हणाले, देशभरातील अन्य राज्यांत ४० टक्के ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा पुरविण्यात येणार आहे. डिसेंबर २०१५पर्यंत या टेक्नॉलॉजीचा लाभ नागरिकांना मिळणार असल्याची घोषणाही या वेळी करण्यात आली.