पवनानगर रस्त्याची चाळण

By admin | Published: July 14, 2017 01:51 AM2017-07-14T01:51:21+5:302017-07-14T01:51:21+5:30

लोणावळा-पवनानगर या राज्य मार्गाची खड्डयांमुळे अक्षरश: चाळण झाली

Pavananagar road chalk | पवनानगर रस्त्याची चाळण

पवनानगर रस्त्याची चाळण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : लोणावळा-पवनानगर या राज्य मार्गाची खड्डयांमुळे अक्षरश: चाळण झाली असून प्रवास करताना रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.
या रस्त्याची दैना झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र याचे कसलेही सोयरसुतक वाटत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मात्र जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास याठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य राजश्री राऊत व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
लोणावळा शहरातून पवनानगर, प्रति पंढरी दुधिवरे, लोहगड किल्ला या पर्यटनस्थळांना जाण्यासोबत भैरवनाथनगर, डोंगरगाव, डोंगरगाववाडी, कुसगाववाडी, औंढे, औंढोली, आपटी अशा जवळपास २५ ते ३० गावांना जाण्यासाठी नागरिकांना याच मार्गाने जावे लागते. मागील अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण ही कामे न झाल्याने रस्ता खूप खराब झाला आहे. रस्त्यामध्ये सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे.
अनेक वेळा चारचाकी वाहने व दुचाकी गाड्या या खड्डयांमध्ये आदळून नुकसान होत आहे. रस्त्याच्या कडेचे नाले योग्य प्रकारे साफ झालेले नाहीत. काही ठिकाणी नाल्यांमधील गाळ तसाच काठावर ढीग रचून ठेवण्यात आला आहे. जून महिन्यात लोणावळा परिसरात जोरदार पाऊस झाला. या वेळी भैरवनाथनगर व गणपती मंदिर परिसरातील हा रस्ता काही फूट पाण्याखाली होता. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याने मार्ग काहीकाळ बंद पडला होता.
ग्रामस्थ, शाळकरी मुले, दुग्ध व्यावसायिक व पवनानगर परिसरात जाणारे पर्यटक अशा हजारो जणांना या खड्डेमय रस्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पावसाळ्याचे चार महिने येथे डांबरीकरण करता येत नसले तरी नागरिकांची गैरसोय ठाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने डागडुजी करून खड्डे बुजवावेत अशी मागणी पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत, सदाशिव सोनार, किरण हुलावळे, प्रवीण साळवे, संतोष राऊत, सुरेश कडू, दादा डफळ, अमोल केदारी, लक्ष्मण केदारी, सुरेश गुंड, भाऊ भिवडे, साईनाथ मांडेकर, चंद्रकांत घारे, साईदास निंबळे, राजेश केदारी, बाळासाहेब गुंड, हनुमान भोसले, कैलास दाभणे आदींनी केली आहे.

Web Title: Pavananagar road chalk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.