किल्ल्यांच्या पायथा विकासाची कामे रखडली
By Admin | Published: April 18, 2016 01:50 AM2016-04-18T01:50:04+5:302016-04-18T01:50:04+5:30
राज्यातील महत्त्वाचे किल्ले-गड यांच्या पायथ्याजवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यातील चार टप्प्यांपैकी एकाच टप्प्यातील किल्ले-गडांच्या
मुंबई : राज्यातील महत्त्वाचे किल्ले-गड यांच्या पायथ्याजवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यातील चार टप्प्यांपैकी एकाच टप्प्यातील किल्ले-गडांच्या पायथ्याशी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. उर्वरित टप्प्यांतील किल्ले-गडांच्या पायथ्याशी पायाभूत सुविधांसाठी निधीच उपलब्ध न झाल्याने कामे रखडली आहेत.
राज्य शासनाने किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन किल्ले दुरुस्ती व परिसर विकास व जतन संवर्धनाची कामे करण्याबाबतचा निर्णय घेतला. त्यानुसार किल्ल्यांच्या पायथ्याशीच सुविधा देण्यात येत असून एमटीडीसीकडून (महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ) ही कामे केली जात आहेत. त्याचे चार टप्पे आहेत. टप्पा एकमध्ये रायगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, जंजिरा, पद्मदुर्ग, टप्पा दोनमध्ये पन्हाळा, विशालगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग तर टप्पा तीनमध्ये राजमाची, लोहगड, सिंहगड, तोरणा, शिवनेरी, राजगड आणि टप्पा चारमध्ये हरिश्चंद्र, नाणेघाट व माळशेज घाटाचा समावेश आहे. या कामांची सुरुवात टप्पा तीनमधील किल्ल्यांपासून करण्यात आली. या किल्ल्यांसाठी १0 कोटींचा निधी मंजूर केला. ही कामे पूर्ण करण्यास पाच वर्षे लागली आणि ती चार महिन्यांपूर्वीच पूर्ण झाली आहेत. उर्वरित टप्प्यांसाठी शासनाकडून निधीच उपलब्ध झाला नल्यामुळे ही कामे रखडल्याचे एमटीडीसीतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
टप्पा तीनपासून सुरुवात
या किल्ले मालिका विकासमध्ये पदपथाची कामे, दिशादर्शक फलक, सुशोभीकरण व बैठक व्यवस्था, पर्यटक महिती केंद्र व सुविधा केंद्र, उपाहारगृह, पाण्याच्या टाक्या, स्वच्छतागृह, रिफ्रेशमेंट स्टॉल उभारले जात आहे.
या कामांची सुरुवात टप्पा तीनमधील किल्ल्यांपासून करण्यात आली. या टप्प्यातील किल्ल्यांसाठीची कामे २0११ पासून करण्यास सुरुवात केली.