पवार व माझा मार्ग वेगळा पण ध्येय एकच - मोदी
By Admin | Published: February 14, 2015 02:00 PM2015-02-14T14:00:49+5:302015-02-14T14:13:43+5:30
शरद पवार आणि मी वेगवेगळी विचारधारा असलेल्या पक्षात असलो तरी देशाचा विकास हेच आमचे ध्येय आहे असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये केले आहे.
ऑनलाइन लोकमत
बारामती, दि. १४ - शरद पवार आणि मी वेगवेगळी विचारधारा असलेल्या पक्षात असलो तरी देशाचा विकास हेच आमचे ध्येय आहे असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये केले आहे. शरद पवार आणि माझ्यात महिन्यातून दोन ते तीन वेळा चर्चा होत असते असे मोदींनी उघड केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती दौ-यावर आले आहेत. शरद पवारांच्या कृषी शाळेतील एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत बारामतीतील सभेत शरद पवारांवर तिखट शब्दात हल्लाबोल करणा-या नरेंद्र मोदींनी आज शरद पवारांचे कौतुक केले. शरद पवार केंद्रात कृषीमंत्री असताना मी त्यांच्याकडून गुजरात कृषी विकासाविषयी माहिती घ्यायचो, आमच्या कामात काही त्रुटी आहेत हे मी त्यांच्याकडून जाणून घ्यायचो असे मोदींनी सांगितले. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारमध्ये माझी मदत करणारे शरद पवार हे एकमेव मंत्री होते अशी आठवणही त्यांनी याप्रसंगी सांगितली. शरद पवारांकडून खुप काही शिकण्यासारखे आहे असेही त्यांनी सांगितले. वादसंवादातूनच लोकशाही पुढे सरकते, पण दुर्दैवाने दोन विभिन्न पक्षाचे दिग्गज नेते एकत्र आले की ती बातमी ठरते असा टोलाही त्यांनी प्रसारमाध्यमांना लगावला. बारामतीत गती व मती असल्यानेच या शहराचा विकास झाला असे मोदींनी नमूद केले. साखर निर्याती आणि अॅंग्रो टेक्नोलॉजीवर भर देण्याची गरज असून ठिंबक सिंचन सारख्या पद्धतीद्वारे शेतीमध्ये पाण्याची नासाडी टाळून शेतीचा विकासही करता येईल असे मोदींनी स्पष्ट केले. तर राजकारण फक्त दोन दिवसांपुरते करायला हवे, उर्वरित ३६३ दिवस देशाच्या विकासाकडे बघायला हवे असे शरद पवार यांनी सांगितले.