पवार-राणे भेटीत राजकीय साखरपेरणी, ‘स्वाभिमान’ महाआघाडीत दाखल होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 04:26 AM2018-12-04T04:26:57+5:302018-12-04T04:27:15+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची भेट घेतल्याने तर्कविर्तक लढविण्यात येत आहेत.
कणकवली (जि.सिंधुदुर्ग) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची भेट घेतल्याने तर्कविर्तक लढविण्यात येत आहेत. एनडीएत असलेला राणे यांचा स्वाभिमान पक्ष भविष्यात महाआघाडीत दाखल होण्याच्या दृष्टीने ही साखरपेरणी असल्याची चर्चा आहे.
शरद पवार हे गेले दोन दिवस सहकुटूंब सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासमवेत नातू रोहित, पार्थ व हर्ष हेही आहेत. सोमवारी दुपारी दोन वाजता ते राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानी दाखल झाले. यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यासह स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस आदी पदाधिकारी उपस्थित होते. उभय नेत्यांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. मात्र चर्चेचा तपशील कळू शकला नाही.
या भेटीबाबत विचारले असता, पवार म्हणाले, मी सिंधुदुर्गात आलो होतो. नारायण राणे यांनी मला दूरध्वनी केला होता. त्यामुळे मुंबईला जाता जाता त्यांच्या निवासस्थानी मी सदिच्छा भेट दिली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. कारण तशी चर्चा करण्यासारखा विषय माझ्याकडेही आणि राणेंकडेही नाही. ही केवळ सदिच्छा भेटच होती. राणे यांनी या भेटीबाबत मौन बाळगले असले तरी त्यांचे चिरंजीव नीतेश राणे यांनी, महाराष्ट्राचे राजकारण नारायण राणेंशिवाय होऊ शकत नाही, असे सूचक विधान केले आहे.
राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर स्वाभिमान पक्ष काढला. हा पक्ष एनडीएत सामील झाल्यानंतर त्यांची भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर वर्णी लागली. राणेंना पुन्हा सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवायची असेल, तर आधी हा मतदारसंघ शिवसेनेकडून सोडवून घ्यावा लागेल. सेना आणि राणेंचे एकूण ‘मधूर’ संबंध बघता ती शक्यता कमीच दिसते. त्यामुळे पवारांच्या भेटीतून राणेंनी वेगळा पर्याय शोधला असल्याचे मानले जात आहे.
>राणे हे योग्यच निर्णय घेतील : चंद्रकांत पाटील
स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे हे हुशार राजकारणी आहेत; त्यामुळे जरी ते राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले असले, तरी ते योग्य निर्णय घेतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे व्यक्त केला.