युती तोडण्यासाठी पवारांनी भाजप नेत्याला फोन केला
By admin | Published: October 2, 2014 01:08 AM2014-10-02T01:08:51+5:302014-10-02T01:08:51+5:30
भाजप व राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचा आरोप काँग्रेस व शिवसेनेने केला असतानाच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील त्याचीच री ओढली आहे. युती तोडण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार
राज ठाकरे यांचा आरोप : चारही पक्ष आतून मिळालेले
नागपूर : भाजप व राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचा आरोप काँग्रेस व शिवसेनेने केला असतानाच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील त्याचीच री ओढली आहे. युती तोडण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपच्या एका नेत्याला फोन केला. तुम्ही तिकडे युती तोडा, मी इकडे आघाडी तोडतो असे सांगितले, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी प्रचार सभेत केला.
पश्चिम नागपूरचे उमेदवार प्रशांत पवार यांच्यासह शहर व जिल्ह्यातील मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी झिंगाबाई टाकळी मैदानावर राज ठाकरे यांची बुधवारी रात्री जाहीर सभा झाली. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, उपाध्यक्ष हेमंत गडकरी, अॅड. पराग प्रधान, शहर अध्यक्ष प्रवीण बरडे, उमेदवार प्रशांत पवार, योगेश वाडीभस्मे आदी उपस्थित होते. पूर्व विदर्भातील या पहिल्या सभेत राज ठाकरे यांनी युती व आघाडीत झालेल्या नाट्याची खिल्ली उडविली. ते म्हणाले, महिनाभर काय चालले, हे राज्यातील जनतेला कळलेच नाही.भाजप-शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे चारही पक्ष आतून मिळाले आहेत. या पक्षाच्या नेत्यांचे एकमेकांशी हितसंबंध व पार्टनरशिप जनतेला मूर्ख बनवीत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात शहरे वसताहेत पण वाहतूक, पार्किंग, रस्ते, उद्याने याची शिस्त नाही. शहराची शिस्त कशी असावी, याचाच विचार मनसेने विकास आराखड्यात मांडला आहे.
आपल्याकडे पुढारी हजारो एकर जमिनी विकत घेऊन लवासासारखे खासगी हिलस्टेशन बांधत आहेत. अमेरिकेतही असेच झाले होते. पण तेथील तत्कालीन अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी या सर्व खासगी जमिनी ताब्यात घेऊन राष्ट्रीय संपत्ती जाहीर केली. महाराष्ट्रातही तेच करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपले मराठी तरुण पोलीस भरतीत धावून धावून मरतात, तर दुसरीकडे परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्याला आठ दिवसात सिक्युरिटी एजन्सीमार्फत नोकरी मिळते. हे थांबवायचे आहे. एकदा का महाराष्ट्रात सत्ता आली की या सर्व सिक्युरिटी एजन्सी बंद करून सरकारी एजन्सी सुरु केली जाईल व तीत फक्त महाराष्ट्रातील मुलांनाच नोकरी मिळेल असा कायदा केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
मोदींच्या चेहऱ्यावर
निवडणुका का लढवता ?
राज्यभर भाजपच्या प्रचाराचे मोठमोठे होर्डिंग्ज लागले आहेत. यावर फक्त मोदींचा फोटो आहे. राज्यातील नेते कुठे गेले, मोदींच्या चेहऱ्यावर निवडणुका का लढविता, असा सवाल करीत राज्यातील भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर मते मिळत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. लोकसभेत झाले ते झाले. महाराष्ट्रातील प्रश्न वेगळे आहेत. येथे राष्ट्रीय पक्षाची गरज नाही. आता केंद्र महाराष्ट्राचे भाग्य ठरवणार नाही, असेही ठणकावून सांगत त्यांनी भाजपला लक्ष्य केले. नाकाम विरोधी पक्षामुळेच आघाडीचे सरकार १५ वर्षे चालल्याची टीका त्यांनी केली. आदिवासी तरुण चांगले नेमबाज आहेत. पण त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत धनुष्यबाण हाती घ्यायला मिळत नाही. पण इकडे पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण आहे. तो धनुष्य कुणाच्या हातात नाही अन् त्यातील बाण कधी सुटतही नाही, अशी शिवसेनेची खिल्ली त्यांनी उडविली.
पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष
संत्रा आहे कारखाने नाहीत
विदर्भ, नागपुरात वनसंपदा आहे. हे ‘कॅपिटल आॅफ जंगल’ आहे. सभोवतालच्या जंगलात वाघ आहे. मात्र, पर्यटनाकडे पार दुर्लक्ष झाले आहे. गोव्यात पर्यटनासाठी जगभरातून १२०० खासगी विमाने येतात. पण नागपूरचे हे नैसर्गिक वैभव कुणालाच माहीत नाही. संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरात संत्रीच दिसत नाही. संत्र्यावर प्रक्रिया करणारा एकही कारखाना येथे नाही. कापूस पिकविणारा शेतकरी आत्महत्या करीत आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी एकदा मनसेला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
पश्चिम नागपूर एसएनडीएलमुक्त
करणार- प्रशांत पवार
पश्चिम नागपुरातील नागरिकांना एसएनडीएलतर्फे विजेची अवास्तव बिले पाठविली जात आहे. लूट सुरू आहे. ही लूट थांबविली जाईल. पश्चिम नागपूर एसएनडीएलमुक्त केले जाईल, असे आश्वासन मनसेचे उमेदवार प्रशांत पवार यांनी दिले. पवार म्हणाले, पश्चिम नागपुरातील अविकसित ले-आऊटमध्ये अनेक समस्या आहेत. रस्ते नाहीत. पिण्याचे पाणी मिळत नाही. पाण्याची बिलेही अवाजवी येतात. हेसर्व प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. प्रत्येक प्रभागात एक रुग्ण वाहिका व शववाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या वेळी मनसेचे पदाधिकारी चंदू लाडे, मिलिंद महादेवकर, विजय भोयर, मंगेश पात्रीकर, रवी वऱ्हाडे, अरुण तिवारी आदी उपस्थित होते.