पवारांनी दिली जेटलींना क्लीन चिट
By Admin | Published: December 25, 2015 04:35 AM2015-12-25T04:35:50+5:302015-12-25T08:20:23+5:30
दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अरुण जेटली गलिच्छ काम करणार नाहीत. ते चुकीच्या रस्त्याला जाणार नाहीत. त्यांच्या बरोबरच्या लोकांनी चुका केल्या असतील.
पुणे : दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अरुण जेटली गलिच्छ काम करणार नाहीत. ते चुकीच्या रस्त्याला जाणार नाहीत. त्यांच्या बरोबरच्या लोकांनी चुका केल्या असतील. जेटलींनी त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे होते हे बरोबर असले, तरी त्यांच्यावर हल्ला केला जातो हे काही योग्य नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी अर्थमंत्री जेटली यांची गुरुवारी येथे पाठराखण केली.
क्रिकेट आणि अरुण जेटली यांच्या प्रश्नावरून राज्यसभेचे कामकाज चालत नाही, या अनुषंगाने लोकमत माध्यम समूहाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी अरुण जेटली यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत आपले काय मत आहे, असा प्रश्न करत शरद पवार यांना बोलते केले. यावर उत्तर देताना पवार म्हणाले, ‘‘राजकारणात एखाद्या व्यक्तीला ठोकायची संधी मिळाली, की विरोधकांनी ती सोडायची नसते, हे तत्त्व मान्य झालेले आहे. त्यामुळे विरोधकांनी जेटलींबाबत ही भूमिका घेतलेली असेल. मला स्वत:ला असे व्यक्तिगत हल्ले करणे पसंत नाही. जेटली हे अध्यक्ष आहेत. मात्र ते ‘डे टू डे’ काम पाहत नाहीत. अध्यक्षाचे ते कामही नाही. पायाभूत सुविधा निर्मिती, निधी उभारण्यासाठी मदत करणे हे त्यांचे काम आहे. कोणाला किती पास द्यायचे व कोणत्या दुकानातून कोणता माल खरेदी करायचा, हे काम अध्यक्ष पाहत नाहीत.’’
राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल ते म्हणाले, ‘‘आज अनेकांच्या टीकेचे ते माध्यम झाले असले, तरी आठवड्यातील ४ दिवस देशाच्या कानाकोपऱ्यांत फिरत आहेत़ देशातील विविध भागांची माहिती घेण्याची ते धडपड करीत आहेत़ नेतृत्व यातूनच तयार होत असते़ त्यादृष्टीने त्यांना यश मिळाले, तर काँग्रेस या नेतृत्वाचा विचार करू शकेल़
लोकशक्तीचा पाठिंबा कायम नसतो. आमच्यापेक्षा लोक शहाणे असतात. एक वर्षापूर्वी मोदी आणि भाजपाने मोठे यश मिळविले़ आता एक वर्षानंतर गुजरात व राजस्थान जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या़ गुजरातमध्ये बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये भाजपाचा पराभव झाला, तर राजस्थानमध्ये ३-४ जिल्हे वगळता तेथेही पराभव झाला़ आनंदीबेन पटेल आणि वसुंधराराजे शिंदे यांच्या जिल्ह्यात त्यांना पराभव पाहावा लागला़ याचा अर्थ, लोक कायम पाठीशी राहत नाहीत. रस्ता योग्य असेल तर लोक साथ देतात, ट्रॅक बदलला की साथ सोडतात़ आमचा शहाणपणा त्यांच्यापेक्षा मर्यादित आहे़’’
यावेळी पद्म पुरस्कारप्राप्त पुणेकरांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला़ ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर यांनी सूत्रसंचालन तर, महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी आभार मानले़.
>> मराठवाड्यात शिवसेना वाढण्यास आपणच जबाबदार असल्याची कबुली देताना पवार म्हणाले, ‘‘मी समाजवादी काँग्रेसमधून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे स्थानिक पातळीवर प्रस्थापितांना विरोध करणारे माझ्यापासून दुरावले. ते शिवसेनेत गेल्याने मराठवाड्यात शिवसेना वाढली.’’
>> स्वतंत्र विदर्भाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्याच गळ्यात टाकताना ते म्हणाले, ‘‘भाजपाची भूमिका छोट्या राज्यांना अनुकूल आहे. राज्यात त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभेत याबाबत तसा ठराव आणल्यास आमचा त्याला विरोध असणार नाही. मुख्यमंत्र्यांनी पुढच्या वेळी स्वतंत्र विदर्भाच्या नावाने निवडणूक लढवावी़ मतपेटीद्वारे याचा निर्णय झाल्यास आम्हालाही तो मान्य राहील.
मात्र, महाराष्ट्राला इतिहास आहे, संघर्षातून तो निर्माण झाला आहे़ १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून तो निर्माण झाला़ अवघा मराठी माणूस त्यासाठी एकत्र आला होता़ त्याच्याशी आम्ही भावनेने एकरूप झालो आहोत़ महाराष्ट्र एकसंध राहिला, तर आनंदच आहे़ आतापर्यंत स्वतंत्र विदर्भाच्या नावाने उमेदवार उभे केले; पण त्यांना लोकांनी पाठिंबा दिला नाही, हा अनुभव आहे. शेवटी हा निर्णय लोकांनी घ्यायचा आहे़ जनमत काय आहे याला महत्त्व आहे.’’
>> लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी प्रास्ताविक केले़ ते म्हणाले, देशातील कोणत्याही माध्यमाला पवार यांच्या सत्काराचा लाभ मिळाला नाही, तो आम्हाला मिळाला. श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा आणि शरद पवार यांचा ऋणानुबंध होता. विचारात मतभेद असला तरी शरद पवार यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून राजकारण केले़ पण वृत्तपत्रांत राजकारण नेले नाही़ गोंदिया ते गोवा अशी एकात्मता रॅली होती़ त्या वेळी ते मुख्यमंत्री होते़ नागपूरला लोकमत भवनला ते आले होते़ जळगाव येथील लोकमतची वास्तू व प्रिंटिंग मशिनरीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ते आले होते़ औरंगाबाद येथे १९८६मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी लोकमतच्या कार्यालयातच पत्रकार परिषद घेतली होती.
माझ्या खासदारकीच्या पहिल्या निवडणुकीतही पवार साहेबांचे प्रेम आणि आशीर्वाद मला लाभला होता़ पवार यांचा आजपर्यंतचा प्रवास देदीप्यमान आहेच़ पण माझ्या मते, त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च टप्पा अजून यायचा आहे़ तो लवकर यावा आणि त्याही वेळी त्यांचा सत्कार करण्याची संधी ‘लोकमत’ला मिळावी, अशी भावना दर्डा यांनी व्यक्त केली.
>> आमच्यापेक्षा लोक शहाणे
लोकशक्तीचा पाठिंबा कायम नसतो. आमच्यापेक्षा लोक शहाणे असतात. गुजरातमध्ये बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये भाजपाचा पराभव झाला, तर राजस्थानमध्ये ३-४ जिल्हे वगळता तेथेही पराभव झाला़ याचा अर्थ, लोक कायम पाठीशी राहत नाहीत. रस्ता योग्य असेल तर लोक साथ देतात, ट्रॅक बदलला की साथ सोडतात़ आमचा शहाणपणा त्यांच्यापेक्षा मर्यादित आहे़
- शरद पवार
शरद पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणा-या स्लाईडशोसाठी इथे क्लिक करा.