लोकशाही नांदणाऱ्या घरात जन्मलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे पवार- जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 12:34 AM2020-12-13T00:34:12+5:302020-12-13T00:34:42+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व्हर्च्युअल अभीष्टचिंतन सोहळा
ठाणे : शरद पवार यांचे कुटुंब कधीच काँग्रेसशी जाेडलेले नव्हते. त्यांच्या कुटुंबाची नाळ शेकापशी जोडलेली होती. मात्र, त्यांचा जन्म लोकशाही नांदणाऱ्या घरात झाला. म्हणूनच ते लोकशाहीसाठी झगडणाऱ्या काँग्रेसी विचारधारेचे झाले. या देशाला सामाजिक सलोखाही पवारसाहेबांनीच शिकविला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त शरद पवार हे थेट नागरिकांना भेटणार नसल्याने पक्षातर्फे व्हर्च्युअल अभीष्टचिंतन सोहळा गडकरी रंगायतनमध्ये आयोजित केला हाेता. यावेळी मंचावर शरद पवार, अजित पवार, प्रांताध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते. डॉ.आव्हाड म्हणाले की, शेकाप विचारधारेच्या कुटुंबात जन्माला आलेल्या शरद पवार यांनी काँग्रेसची विचारधारा स्वीकारली. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना आपले मानसपुत्र मानले. चव्हाण आणि पवार यांच्यामध्ये अनेक वेळा संघर्षही झाला होता.
मात्र, हा संघर्ष प्रेमाचा होता. १९६२ मध्ये भारत-चीन युद्धावेळी पुण्यात चीनविरोधात मोर्चा काढणारे शरद पवार हेच होते. पुढे ते देशाचे संरक्षणमंत्री झाले. पवार हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. अर्थ, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांचा अभ्यास असलेले देशातील ते एकमेव व्यक्ती आहेत, असे आव्हाड यावेळी म्हणाले.
बहुआयामी व्यक्ती
१९९०-९१ला डावोसमधील त्यांच्या भाषणाने प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि तत्कालीन अर्थमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांनाही भुरळ पाडली हाेती. मुंबई बॉम्बस्फोटानंतर अवघ्या ४८ तासांत मुंबईचे शेअर मार्केट सुरू करून त्यांनी कणखरपणा दाखविला हाेता. जब्बार पटेल, विजय तेंडुलकर, नामदेव ढसाळ, अमरशेख यांना सढळ हस्ते मदत केली. तमासगिरांच्या पोटापाण्याची व्यवस्था लावणारे ते एकमेव नेते आहेत. पंजाबमधील हिंसाचार रोखण्याची वेळ आली, तेव्हा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी पवारांकडे ही जबाबदारी साेपविली होती. अंधश्रद्धा दूर करून शेवग्याची शेती करण्यास प्रवृत्त करणारे शरद पवार हे पुरोगामी नेतृत्व आहेत, अशा शब्दांत डॉ.आव्हाड यांनी पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला.