क्रिकेटच्या मैदानातून पवार होणार ‘रिटायर’!
By Admin | Published: July 25, 2016 05:21 AM2016-07-25T05:21:07+5:302016-07-25T05:21:07+5:30
गेली अनेक वर्षे राजकारणाबरोबरच क्रिकेट खेळाच्या व्यवस्थापनावर वर्चस्व जागविणारे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी क्रिकेटच्या मैदानावरून निवृत्त होण्याची घोषणा केली
मुंबई : गेली अनेक वर्षे राजकारणाबरोबरच क्रिकेट खेळाच्या व्यवस्थापनावर वर्चस्व जागविणारे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी क्रिकेटच्या मैदानावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. हातातील कामे संपताच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदाचा आपण राजीनामा देणार असल्याचे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यप्रणालीमध्ये पारदर्शकपणा आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्या. लोढा समितीने ७० वर्षांवरील व्यक्तीला क्रिकेट संघटनांतून वगळण्याची, तसेच नऊ वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ कोणालाही मिळता कामा नये, अशा शिफारशी केल्या आहेत. या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी रविवारी ‘एमसीए’ची बैठक झाली. त्यानंतर एमसीएचे अध्यक्ष शरद पवार आणि उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला मान देत एमसीएने सर्व शिफारसी स्वीकारल्या आहेत. तर एक-दोन शिफारसींवर बीसीसीआयकडून अधिक स्पष्टीकरण हवे आहे. ‘एक राज्य एक वोट’, या शिफारशींबाबत बोलताना पवार म्हणाले,
महाराष्ट्रासारख्या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या संघटना कार्यरत आहेत. संघटनांच्या रोटेशन पद्धतीला आमचा विरोध आहे. त्यामुळे या शिफारसींबाबत बीसीसीआयकडून अधिक स्पष्टीकरण मागविले आहे. मुळात मुंबई क्रि केट असोशिएशन ही सर्वांत महत्त्वाची व जुनी संघटना आहे. त्यामुळे संघ निवडताना व खेळाडूंच्या हिताचे निर्णय घेताना ते अडचणीचे ठरणार आहे. शिवाय, ‘एमसीए’च्या घटनेत बदल करावा लागणार आहे. त्यानंतर व्यवस्थापकीय समितीची बैठक बोलावून सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात येईल, ही सर्व प्रक्रिया सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पवार यांनी दिली.
न्या.लोढा समितीने सूचविल्याप्रमाणे ७० वर्षे वयाची अट आणि नऊ वर्षाचा कार्यकाळ, या दोन्ही सीमा मी ओलांडल्या आहेत, त्यामुळे बाजुला होण्याचा निर्णय घेतला आहे. हातावर काही कामं शिल्लक आहेत, ती संपताच पद सोडणार असल्याचे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)