पवारसाहेब.. चार दोन खासदारांवर पंतप्रधानपद कसे शक्य आहे हो. ? महादेव जानकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 03:53 PM2019-04-22T15:53:56+5:302019-04-22T16:00:42+5:30
पुढे मागे आमच्या पक्षाला पंतप्रधानपदाची संधी मिळेल,तेव्हा पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न रासप पूर्ण करेल...
शिरूर: शरद पवार हे आदरणीय नेते आहेत. त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. मात्र चार दोन खासदारांवर पंतप्रधानपद कसे शक्य आहे हो ? पुढे मागे आमच्या पक्षाला पंतप्रधानपदाची संधी मिळेल,तेव्हा पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न रासप पूर्ण करेल. असा टोला पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत लगावला..
रांजणगाव गणपती येथे सभेला जाण्यापूर्वी जानकर यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. जानकर यांनी पवारांवर सडकून टीका केली. ते म्हणाले. पवार शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतात. मग त्यांनी समाजात दरी का निर्माण केली ? त्यांनी सहकार चळवळ मोडीत काढली. खासगी साखर कारखानदारी आणली. ज्यांच्या नावाचा जप पवार करतात त्या शाहू महाराजांनी १८०२ मध्ये सर्वप्रथम आरक्षण दिले. मात्र शाहू महाराजांच्या जातीला आरक्षण मिळण्यासाठी १५० वर्ष लागली. मराठा समाजाचे ११मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.विरोधकांनी मराठा ओबीसी, मराठा धनगर यांच्यात भांडणे लावली. मुख्यमंत्र्यांनी मात्र शांत डोक्याने कायद्याच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण दिले.
जानकर म्हणाले , देशात सक्षम, समृध्द व संरक्षित सरकार हवे असेल तर नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी रासपची भुमिका आहे.आजपर्यंत भारताला जगात फारशी किंमत नव्हती. पंतप्रधान मोदी यांच्या कर्तृत्व व चांगल्या धोरणामुळे आज जगात भारत चौथ्या स्थानावर आहे, असा धोरणात्मक विचारांचा पंतप्रधान हवा की घराणेशाहीतला पंतप्रधान हवा ते जनतेनेच ठरवावे. गरीबी हटावचा नारा देणा ऱ्या काँग्रेसने सत्ता भोगली मात्र गरीबी कोणाची हटली याचे भारतातील जनतेने चिंतन करावे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील उच्चशिक्षित आहेत, चांगले संसदपटू आहेत प्रशासनाची जाण असणारे नेतृत्व आहे. अशा उमेदवारास दिलेले एक मत मोदींना पंतप्रधान बनवतील.यासाठी सरकारने आदिवासीना जेवढे बजेट आहे तेवढे धनगरांना दिले. सर्वोच्च न्यायालयात एसटी संदर्भातील प्रलंबित आहे.तेथेही सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. यामुळे आम्हीच धनगरांना आरक्षण देणार असल्याचा दावा जानकर यांनी केला.
............
बैलगाडा शर्यतीचा विषय न्यायप्रविष्ट आहे. मात्र या विषयावर आम्ही सर्व सभागृह एकत्र आणले. आम्ही कायदा केला. न्यायालयात गेल्याने विषय प्रलंबित राहिला. मात्र कायद्याच्या अधीन राहून आम्हीच या शर्यती सुरू करू असा दावाही जानकर यांनी केला.