पवारांना काळजी; सेनेत राहून NCPची भांडी कोण घासणार? अन् उध्दव ठाकरेंना काळजी...; भाजप आमदाराचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 02:05 PM2022-07-31T14:05:57+5:302022-07-31T14:06:42+5:30
Sanjay Raut : ईडीच्या धाडीनंतर राऊत यांनी ट्विट करत म्हटले होते, “कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.”
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज (रविवारी) सकाळी सात वाजताच्या सुमारास ईडीच्या पथकाने त्यांच्या मुंबईतील भांडूप परिसरामधील बंगल्यावर धाड टाकली. यानंतर, “कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे.” असे ट्विट संजय राऊत यांनी केले होते. यावर, "संजय राऊत हे स्पष्टोक्ते आहेत, माझे चांगले मित्र आहेत पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ न घेता शरद पवारांची शपथ घ्यायला पाहिजे होती. त्यांनी पवारांची शपथ घेतली असती तर अनेकांना त्यांचे म्हणणे खरे वाटले असते," असा टोला रामदास कदम यांनी लगावला होता. यानंतर आता, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे नाव घेत राऊतांवर बोचरी टिका केली आहे.
ईडीच्या धाडीनंतर, राऊतांवर बोचरी टीका करताना अतुल भातखळकर यांनी, "उध्दव ठाकरेंना काळजी... अटक झाली तर मुलाखत कोणाला देणार? पवारांनाही काळजी... शिवसेनेत राहून राष्ट्रवादीची भांडी कोण घासणार?" असे ट्विट केले आहे. एवढेच नाही, तर "मराठी माणसांचे गळे कापून बाळासाहेबांची शपथ घ्यायला किती निबर कातडी लागत असेल?, असा सवाल करत, '#५५लाखांचाबळी', असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.
करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय...
आणखी एका ट्विटमध्ये भातखळकर म्हणाले, "करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय आणि इथे शिवीगाळ करून उपयोग ही नाही.... ED वाले ट्विटर वाचत नाहीत आणि पुरेसे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय घरी येत नाहीत. घरी आले की सोबत घेऊनच जातात. घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत." या शिवाय, "पत्राचाळ घोटाळा म्हणजे शिवसेनेने मराठी माणसांच्या घरावर चालवलेला वरवंटा होता आणि हे निर्लज्ज आता मराठीच्या नावाने गळा कढतायत," असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते राऊत -
ईडीच्या धाडीनंतर राऊत यांनी ट्विट करत म्हटले होते, “कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.” एवढेच नाही, तर “खोटी कारवाई. खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र,” असे ट्विटही राऊतांनी केले होते.