पवारांच्या मध्यस्थीने तटकरे कुटुंबातील वाद संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2017 06:53 AM2017-01-18T06:53:48+5:302017-01-18T06:53:48+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर तटकरे बंधुंमधील वाद अखेर संपुष्टात आला
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर तटकरे बंधुंमधील वाद अखेर संपुष्टात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधानपरिषदेचे आमदार अनिल तटकरे या दोन्ही भावांशी चर्चा करून हा वाद मिटवला.
बारामतीत शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी झालेल्या बैठकीला सुनील तटकरे, अनिल तटकरे, आमदार अवधूत तटकरे, अनिल तटकरेंचे धाकटे पुत्र संदीप तटकरे, सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे, सुनील तटकरेंची कन्या आदिती तटकरे आदी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत अनिल तटकरे यांचे चिरंजीव संदीप तटकरे शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. सुनील तटकरे यांना हा धक्का होता. त्या वेळी अनिल तटकरे यांचे थोरले पुत्र अवधुत तटकरे यांनी शिवसेनेकडून लढणाऱ्या संदीप तटकरेंच्या प्रचाराला उपस्थिती लावली. संदीप तटकरेंचे शिवसेनेकडून लढणे, हा तटकरे कुटुंबीयांसाठी मोठा धक्का होता. मात्र, निवडणुकीनंतरच तटकरे कुटुुंबात चर्चा झाली. त्यानंतर, एकत्रित कुटुंब पवार यांच्या भेटीला बारामतीला आले होते.